ग्रामपंचायतीच्या वतीने पाटबंधारे विभागाला निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): अरळगुंडी येथील हिरण्यकेशी नदीपात्रातील पाणी पूर्णपणे संपल्याने गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. गावातील पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ववत होण्याकरिता हिरण्यकेशी नदीपात्रात पाणी सोडावे अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने पाटबंधारे विभागाकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, अरळगुंडी येथील ग्रामदैवत श्री वाकडा देवी मंदिराशेजारी नदीपात्रात जॅकवेल आहे. येथून उपसा होणारे पाणी प्राथमिक शाळेजवळील जलकुंभात साठवले जाते व तेथून गावाला वितरित केले जाते. ग्रामपंचायतीने खणदाळ येथे हिरण्यकेशी नदीवर नवीन योजना केली आहे. मात्र त्या ठिकाणी सुद्धा नदीपात्रातील पाणी संपले आहे. दोन्ही जॅकवेलच्या ठिकाणी पाणी नसल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्याची गरज आहे.

