गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हलकर्णी येथील सुपुत्र ॲड. शंकरराव रानबा धबाले यांची भारत सरकारकडून नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल कै. शंकरराव नाडगोंडे विद्यामंदिर बसर्गे येथे सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णाप्पा शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून आनंद नांगनुरे उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार शिंगटे यांनी करून ॲड. धबाले यांना पुढील आयुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. सुभाष बारामती, भिमराव तराळ, असलम मुल्ला, दादासाहेब पाटील, वैशाली धबाले, अनिल गोणी, आनंद नांगनुरे, अर्जुन चौगुले यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सत्काराबद्दल बोलताना ॲड. धबाले म्हणाले, आपण गेली 25 वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली असून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम अखेर केले आहे. यापुढेही असेच कार्य करत राहीन. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून योग्य दिशेने वाटचाल केल्यास निश्चितच यश प्राप्त होते. अपंग,अंध विद्यार्थी प्रचंड मेहनत करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवतात. त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते. असे सांगून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच सकाळी लवकर उठून व्यायाम करावा, रात्री लवकर झोपावे, पहाटे अभ्यास करावा, सकस आहार घेण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अण्णाप्पा शिंदे यांच्यावतीने ॲड. धबाले यांचा शाल, श्रीफळ, मानाचा फेटा देऊन सत्कार करण्यात आला. राधाकृष्णन पतसंस्थेचे चेअरमन भरत पाटील व श्री. मकानदार यांच्या हस्ते देखील ॲड. धबाले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनीही त्यांचा सत्कार केला. अर्जुन चौगुले यांनी ॲड. धबाले यांच्या जीवनावर आधारित काव्यात्मक रचना सादर केली.
यावेळी तनवी कारागीर, अंगणवाडी सेविका राजश्री चौगुले, सुजाता चौगुले, महादेवी घटेकरी, मदतनीस शोभा चौगुले, रीता कांबळे नागवा थोरात उपस्थित होत्या.





