Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'मशाल चिन्ह' हाच उमेदवार समजून शिवसैनिकांनी कामाला लागावे!

लोकसभा कोल्हापूर जिल्हा समन्वयक सुनील पाटील यांचे शिवसैनिकांना आवाहन


गडहिंग्लज येथील ठाकरे पक्ष शिवसेना जिल्हा ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयात आढावा बैठक




गडहिंग्लज : उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांचा सत्कार करताना शिवसेना लोकसभा जिल्हा समन्वयक सुनील पाटील. यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघातून उमेदवारी कोणाला द्यावयाचे हे पक्ष ठरवेल. त्यामुळे उमेदवार कोणीही असले तरी मशाल चिन्ह हाच उमेदवार समजून शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन शिवसेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) लोकसभा जिल्हा समन्वयक सुनील पाटील यांनी केले.




लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर   कोल्हापूर जिल्हा संपर्क दौऱ्याप्रसंगी गडहिंग्लज येथील शिवसेनेच्या जिल्हा ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयात आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे उपस्थित होते.



यावेळी बोलताना जिल्हा समन्वयक सुनील पाटील पुढे म्हणाले, राज्यासह  कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांचे व ध्येय धोरणांचे जनतेतून स्वागत होत आहे. शिवसेनेबद्दल एक सहानुभूतीची लाट राज्यभरात आहे. लोकसभेसह विधानसभेवरीही ठाकरे पक्ष शिवसेनेचा भगवा फडकावा हीच इच्छा जनतेची आहे. त्यामुळे 'गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक' ही मोहीम शिवसैनिकांनी यशस्वीपणे राबवून गावागावातील मतदारांपर्यंत पोहोचावे. आता कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुका जाहीर होतील. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कोणाला द्यावयाची याचा निर्णय पक्ष घेईल. उमेदवार कोणीही असो मशाल चिन्ह हाच उमेदवार समजून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी आमची व तुमची आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी मोठ्या जोमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.



शिवसैनिकांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे : जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे





जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांचे व शिवसैनिकांचे आहे. येत्या काही दिवसात कोल्हापूर जिल्हा ग्रामीण भागातील शिवसेनेत काही नवीन नियुक्त्या करून पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. या माध्यमातून पक्ष संघटनेला बळकटी देण्याच काम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यापासून मतदार संपर्क मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी करावी असे आवाहन प्रा. शिंत्रे यांनी केले.





यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांचा तसेच गडहिंग्लज तालुका प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल अजित खोत, आजरा तालुका प्रमुख पदी  युवराज पवार, नूल-हसुरचंपू मतदारसंघांमध्ये उपतालुकाप्रमुख पदी सुरेश हेब्बाळे, विभाग प्रमुख पदी राजू रामजी यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा समन्वयक सुनील पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



या आढावा बैठकीस चंदगड उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, आजरा तालुका प्रमुख युवराज पवार, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने व अजित खोत, चंदगड तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर, गडहिंग्लज शहर प्रमुख संतोष चिकोडे, युवासेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील   यांच्यासह उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.