Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कार्यकर्त्यांनो, तुम्हाला कधीही पोरकं होऊ देणार नाही....!

तुमच्या प्रत्येक प्रश्नात, लढ्यात मी ढाल बनून उभी राहीन!


जनता दलाच्या नेत्या प्रा. सौ. स्वाती कोरी यांनी दिला कार्यकर्त्यांना धीर  


भाजपसोबत कदापिही न जाण्याचा घेतला निर्णय


कोल्हापूर जिल्ह्यातील निर्णयाचे सर्वाधिकार सौ. कोरी यांना 


गडहिंग्लजला जनता दलाच्या कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा







गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आमची केंद्रात वा राज्यात सत्ता नाही. कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाचा आमदारही नाही, असे असले तरीही आजच्या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले जनता दलाचे एकनिष्ठ, निष्ठावंत कार्यकर्ते हीच आमची पक्षाची खरी ताकद आहे. माझे वडील व माजी आमदार कै. ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्यावरील प्रेमापोटी तुम्ही कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहिलात. आज साहेब नाहीत आमचे वाली कोण ? ही उणीव मी तुम्हाला भासू देणार नाही. तुम्हाला कधीही पोरकं होऊ देणार नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नात, लढ्यात मी ढाल बनून उभी राहीन. तुमच्यासाठी प्रसंगी कोणाचे पाय धरावे लागले तरी चालतील त्यातही मी कमीपणा मानणार नाही, असा धीर जनता दलाच्या नेत्या व माजी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी यांनी गडहिंग्लज येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला. आगामी निवडणुकांमध्ये जनता दल कदापि भाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका देखील त्यांनी या मेळाव्यात जाहीरपणे सांगितली. दरम्यान, लोकसभा, विधानसभासह इतर निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील निर्णय घेण्याचा सर्वाधिकार जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी सौ. कोरी यांना दिल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.



गडहिंग्लज येथे जनता दलाच्या कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा मंत्री हॉल येथे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सौ. स्वाती कोरी बोलत होत्या. माजी आमदार स्व. ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचा प्रारंभ करण्यात आला.


गडहिंग्लज : कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्यात बोलताना जनता दलाच्या नेत्या व माजी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी. यावेळी उपस्थित प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी.
                         छायाचित्र : अशपाक किल्लेदार, गडहिंग्लज 


यावेळी बोलताना सौ. कोरी पुढे म्हणाल्या, माझे वडील जनता दलाचे नेते स्व. श्रीपतराव शिंदे यांनी हयात असताना कोणत्याही जातीयवादी, धर्मांध पक्षाशी कधीच युती केली नाही.  प्रसंगी माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या निर्णयालाही त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे स्वार्थासाठी त्यांनी आपली तत्वे, विचार यांना कधीच तिलांजली दिली नाही. जात, धर्म, देव आपल्या उंबऱ्याच्या आत पाळावा व उंबऱ्याच्या बाहेर माणुसकीची जात जोपासावी हीच शिकवण ॲड. शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. त्यांचे हे विचार कार्यकर्त्यांच्या नसानसात भिनलेले आहे. त्यांच्या या विचारांचा वारसा घेऊनच पक्षाची वाटचाल सुरू आहे. पंतप्रधान मोदी म्हणत होते की भ्रष्टाचारमुक्त देश करूया, मात्र ज्यांच्या पाठीमागे ईडी लागले ते तुमच्यासोबत चालतात कसे? भाजपसोबत आल्यावर ते स्वच्छ होतातच कसे? असा सवाल देखील सौ. कोरी यांनी यावेळी केला. जनता दलाच्या कार्यकर्त्यांवर भ्रष्टाचाराचे कोणतेही डाग नाहीत त्यामुळे आम्हाला तुमच्या वॉशिंगमध्ये येऊन स्वच्छ व्हायचे नाही. असा उपरोधिक टोला देखील सौ. कोरी यांनी लगावला. देशात आज हुकूमशाही सुरु असून लोकशाहीची गळचेपी केली जात आहे. लोक उघडपणे आपली मते मांडू शकत नाहीत. महिलांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याकडे लक्ष वेधत सौ. कोरी यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.



...यासाठीच साहेबांनी मुंबईतील जनता दलाच कार्यालय स्वतःच्या खिशातले पैसे भरून वाचवलं!




सरकार मुंबईतील जनता दलाचे कार्यालय काढून घेण्याचा प्रयत्न करत होत. त्यावेळी शिंदे साहेबांनी आपल्या तब्येतीचे, अंगावरील दुखण्याची कोणतीही काळजी न करता स्वतःच्या खिशातले अडीच लाख रुपये व युवा जनता दलाचे सुमित पाटील यांचे आजोबा शरद पाटील व प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी स्वतःच्या खिशातले पैसे भरून कार्यालय वाचवलं. कारण आपल्या खेड्यापाड्यातील लोक विविध कामांसाठी मुंबईला जातात. मुंबईसारख्या ठिकाणी राहणे हे गोरगरीब जनतेला परवडण्यासारखे नाही. तेव्हा एक हक्काचे विसाव्याच ठिकाण त्यांना मुंबईत येथे असाव. कामासाठी जातील तेव्हा त्यांना तेथे निवासाची सोय व्हावी. यासाठी हे कार्यालय वाचविण्याची त्यांची धडपड होती. हा प्रसंग सौ. कोरी यांनी या मेळाव्यात सांगितल्यानंतर माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या आठवणीने कार्यकर्त्यांचे डोळे पाणावल्याचे दिसून आले.




कोल्हापूर जिल्ह्यातील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार सौ. कोरी यांना : प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे





प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे म्हणाले, गडहिंग्लज व कोल्हापूर जिल्ह्यातील जनता दल हा आमचा आत्मा व ताकद आहे. त्यामुळे राज्यात व देशात काय व्हायचं ते होऊ दे, परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणारी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत या निवडणुकांबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार सौ. स्वाती कोरी यांना देत असल्याचे जाहीर केले. राज्याचे आणि केंद्राचे नेतृत्व सौ. कोरी यांच्या निर्णयाआड येणार नसल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.



स्वातीताई ह्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व : तालुकाध्यक्ष बाळेश नाईक





तालुकाध्यक्ष बाळेश नाईक म्हणाले, जनता दलाचे नेते माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या निधनानंतर बैठक घेऊन जनता दलाचे नेतृत्व यापुढे सौ स्वाती कोरी यांनी करावं असा निर्णय घेऊन त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्याच नेतृत्व त्यांनी करावं असं आवाहन त्यांना केलं. कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि हे आव्हान देखील त्यांनी यशस्वीपणे पेलल आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात स्वातीताई जो निर्णय घेतील तो निर्णय राज्य जनता दलाला मान्य असेल अशी घोषणा आजच्या मेळाव्यात करण्यात यावी अशी विनंती श्री नाईक यांनी प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्याकडे केली. शिंदे साहेबांचा सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी असणारा चळवळीचा वारसा आणि वसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. गोरगरीब, कष्टकरी जनतेच्या प्रश्नासाठी आपल्याला लढा द्यावयाचा आहे. स्वातीताई या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची दिलेली जबाबदारी सक्षमपणे ते पार पडतील. असा विश्वास देखील त्यांनी राज्य नेतृत्वाला यावेळी दिला.




यावेळी राज्य उपाध्यक्ष ॲड. सुहास बन्ने, माजी नगराध्यक्ष बापसो मेहेत्री, तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, सदानंद व्हनबट्टे, काशिनाथ देवगोंडा, श्रीरंग चौगुले, शरद पडळकर, माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी, विठ्ठल मुसळे यांची भाषणे झाली.




या मेळाव्यास सचिव भगवान साळवे, अकबर मुल्ला, बाळासाहेब मोरे, राम मजगी, बाबासाहेब पाटील, वसंतराव पाटील, भीमराव पाटील, शिवाजी काकडे, रमेश मगदूम, शंकर रणदिवे, नितीन देसाई, कृष्णा परीट, गुरुनाथ मोरे, सागर पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैलेश पाटील यांनी स्वागत केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.