डॉ. संजीवनी जाधव यांचा महिलांना सल्ला
महागावात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी): बदलत्या जीवनशैलीमुळे व आहारामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये गर्भाशयमुखाचा कॅन्सर, मासिक पाळीच्या समस्या, ब्रेस्ट कॅन्सर, चाळीस वर्षानंतर महिला अनेक आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे महिलांनी कुटुंबाचा सांभाळ करत स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉ. संजीवनी जाधव यांनी दिला.
महागाव येथील आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. नेसरी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या माधुरी बेहंजी, डॉ .सोनाली गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक रेशमा पोटे यांनी केले. यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची, खेळ पैठणीचा, फनी गेम्स आधी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. माधुरी बेहंजी यांनी अध्यात्म ध्यानधारणा व योग या विषयावर विवेचन करत महाशिवरात्रीचे महत्त्व सांगितले. डॉ.सोनाली गोरे यांनी दातांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी कॅप्टन महादेव घुगरे,धर्मा केसरकर, सचिन सावंत,प्रकाश इंगवले,संजय कांबळे, दिपक पोटे यांच्यासह आजी माजी सैनिक माता, पत्नी,महिला,संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सौ. घुगरे यांनी मानले.



