शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरात ग्वाही
महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीची घोषणा
कोल्हापूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांची उमेदवारी जाहिर झाल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. हे सांगतानाच छत्रपती शाहू महाराजांना शिवसैनिक पूर्ण ताकतीने विजयी करतील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मिरज येथे सायंकाळी सभा होती. या सभेसाठी कोल्हापूर विमानतळावर आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. यावेळी मालोजीराजे छत्रपती, तेजस ठाकरे, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, सचिव व स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, उपनेते व जिल्हासंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख संजय पवार, आमदार वैभव नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराज यांच्याशी आमच्या आजोबांच्या पासून ऋणानुबंध आहेत. पिढ्यानपिढ्या हे ऋणानुबंध असेच टिकून राहतील. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी जाहिर झाल्याचे सांगून त्यांना शिवसैनिक पूर्ण ताकतीने विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार....नक्कीच येणार असे वचन देखील आपण महाराजांना दिल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.


