Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी तुरुंगात जाऊ, पण मागे हटणार नाही!

ठाकरे पक्ष शिवसेना उपनेते संजय पवार यांची जनतेला ग्वाही


आजरा येथे पार पडली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक 



आजरा : उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांचा सत्कार करताना शिवसेनेचे उपनेते संजय पवार. यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्यासह इतर पदाधिकारी.

आजरा : अन्यायाविरोधात आक्रमकपणे लढा देणे हे शिवसेनेच्या रक्तात भिनले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मूळचा आक्रमकपणा कदापि सोडणार नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी तुरुंगात जावे लागले तरी चालेल परंतु मागे हटणार नाही. अशी ग्वाही शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) उपनेते संजय पवार यांनी दिली.



आजरा येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी उपनेते श्री. पवार बोलत होते. या बैठकीस जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांची उपस्थिती होती. प्रारंभी आजरा तालुकाप्रमुख युवराज पवार यांनी स्वागत केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल संभाजी पाटील यांचा सत्कार उपनेते संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आला.




यावेळी बोलताना उपनेते संजय पवार पुढे म्हणाले, गेली ३४ वर्षे मी शिवसेनेत प्रामाणिक काम केलो आहे. एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत मी कधीच आत बाहेर केलो नाही, पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. त्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राज्यसभेची उमेदवारी, उपनेतेपद यासह विविध पदांची जबाबदारी सांभाळण्याची संधी दिली आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची मजबूत बांधणी करून पक्षप्रमुखांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवेन. सर्व शिवसैनिकांसाठी व जनतेसाठी माझ्या घराचे दरवाजे सदैव उघडे राहतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची प्रतिमा समाजात चांगली आहे. त्यामुळे शिवसेनेला आज चांगले दिवस येत आहेत. जनतेच्या विविध प्रश्नांसाठी व अन्याय विरोधात शिवसेना पेटून उठेल.  प्रसंगी सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्हाला तुरुंगात जावे लागले तरी चालेल पण आम्ही मागे हटणार नाही. शिवसेना नेहमीच अन्याय विरोधात आक्रमकपणे लढा देत आली आहे. आक्रमकपणा हा शिवसेनेच्या रक्तात आहे, हा आक्रमकपणा शिवसेना कदापि सोडणार नाही, असे ठामपणे त्यांनी सांगितले.



जिल्ह्यातून शिवसेनेला मोठी ताकद देऊ  : जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे





जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, शिवसेना हे एक कुटुंब आहे. शिवसैनिक कुटुंबातले घटक आहेत. प्रत्येक शिवसैनिकाच्या अडीअडचणीत पदाधिकारी धावून जातात यामुळे शिवसैनिकांना लढण्याचे बळ मिळते. या बळाच्या जोरावरच आज शिवसेना टिकून आहे. लोकसभेसह आगामी सर्वच निवडणुका लढविण्यासाठी जिल्हा पातळीवरून मोठी ताकद उभी करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.



या बैठकीस उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, सुरेश पोवार, सुरेश चौगुले, संभाजी भोकरे, आजरा तालुकाप्रमुख युवराज पवार, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, अजित खोत, राधानगरी तालुकाप्रमुख बाबासाहेब पाटील, कागल तालुका प्रमुख  जयसिंग टिकले, चंदगड तालुका प्रमुख  लक्ष्मण मनवाडकर, अनिल दळवी, रणजीत पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अवधूत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आभार दयानंद भोपळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.