हलकर्णी (वार्ताहर) : बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी डॉ. महेश येणेचवंडीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच बसवराज कापसे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच भारती रायमाने होत्या.
या ग्रामपंचायतीवर हतरकी गट व भाजप आघाडीची सत्ता आहे. सत्तारूढ़ आघाडीच्या वतीने डॉ. महेश येणेचवंडीकर यांचे नाव पक्षश्रेष्ठी यांनी जाहीर केले. डॉ. येणेचवंडीकर यांच्या नावाला सर्व सदस्यांनी सहमती देत बिनविरोध निवड करण्यासाठी पाठिंबा दिला.
उपसरपंच पदासाठी श्री. येणेचवंडीकर यांचे नाव सागर शिंदे यांनी सुचवले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी व्ही. व्ही. मुंगारे यांनी काम पाहिले. स्वागत ग्रामविकास अधिकारी पी.बी.पाटील यांनी केले. यावेळी विरपाक्ष टोणपी, सातगोंडा जिनान्नावर, चंद्रशेखर पाटील, पोलीस पाटील भागोजी कागिणकर, सुरेश माणिकेरी, शिवानंद घस्ती, विरपाक्ष घुळान्नावर, भारत टोणपी, तुकाराम पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. सुनील भुईंबर यांनी उपस्थितांचे आभार मानले.



