गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भडगाव येथे जागतिक जल दिनाचे औचित्य साधून गावची तहान भागविणाऱ्या सार्वजनिक गोठण विहिरीचा ७३ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील गोठण विहीर ही संपूर्ण गावची तहान भागविते. गेल्या अनेक वर्षापासून जागतिक जलदिना दिवशी या विहिरीचा वाढदिवस ग्रामस्थांकडून साजरा केला जातो. या उपक्रमाचा पायंडा ठाकरे पक्ष शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख व सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक यांनी पाडला. १९५१ साली कोल्हापूर जिल्हा लोकल बोर्डाच्या माध्यमातून अवघ्या ९९९८ रुपये इतका खर्च करून सदर विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. संपूर्ण विहिरीचे बांधकाम हे दगडातच करण्यात आले आहे. या विहिरीची देखभाल व दुरुस्ती वेळोवेळी ग्रामपंचायतीकडून करण्यात येते.
यावर्षी या सार्वजनिक विहिरीचा ७३वा वाढदिवस होता. यानिमित्त ग्रामस्थांकडून या विहिरीचे पूजन करण्यात आले. संपूर्ण विहिरी भोवती रांगोळी काढून आंब्याच्या डहाळ्यानी विहीर सजविण्यात आली होती. या कार्यक्रमास अजित बंदी, अर्जुन सावेकर, विनायक तोडकर, बसवराज सुतार, बाळासाहेब कांबळे, अक्षय चिंचेवाडी, आनंदी मांग यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक यांनी केले होते.



