ठाकरे पक्ष शिवसेना उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी यांची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील दसरा चौकातील बंद असलेले हायमास्ट दिव्यांची तातडीने दुरुस्ती करून पूर्ववत सुरू करावेत अशी मागणी ठाकरे पक्ष शिवसेनेचे उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांनी केली आहे.
गडहिंग्लज बसस्थानक परिसरात सायंकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी असते. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे दसरा चौक परिसरात रात्रीच्या वेळी मोठा प्रकाश पडत असल्याने नागरिकांची चांगली सोय झाली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून हे हायमास्ट दिवे बंद असल्याने या ठिकाणी अंधार पसरलेला आहे. नगरपालिकेने अजूनही सदर दिवे सुरू केलेले नाहीत. त्यामुळे रिक्षा प्रवासी, वृत्तपत्र विक्रेते यासह अन्य कामासाठी या परिसरात येणाऱ्या लोकांना अंधाराचा त्रास होत आहे. सदर गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिकेने हायमास्ट दिवे सुरु करावेत अशी मागणी गडकरी यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

