गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जी.जी.गायकवाड यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशासकीय कर्मचारी नामदेव असोदे व केंपान्ना कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. अशोक मोरमारे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे स्पष्ट करून डॉ.आबेडकर हे राष्ट्रप्रेमाने व राष्ट्राच्या जाणीवेने ओतप्रोत भरलेले असे व्यक्तिमत्व होते. त्यांनी समाजातील उपेक्षितांना, अस्पृश्य, कामगार व तळागाळातील गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याकाळी समाजात होणारा अन्याय निपटून काढण्यासाठी कायदे होणे गरजेचे आहे या जाणिवेने त्यांनी कायद्यांची निर्मिती केली असल्याचे स्पष्ट करून शेतीचे राष्ट्रीयकरण करण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे ही बाबासाहेबांची धारणा होती. आपल्या देशातील शेतकरी सुधारला पाहिजे तरच समाजातील अस्पृश्यता नष्ट होईल असा प्रभावी विचार डॉ.आंबेडकर यांनी मांडला होता. अशा या थोर महामानवाच्या विचारावर आपला देश चालत असल्याचे डॉ. मोरमारे यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात या कार्यक्रमास रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.एम.हसुरे, प्रा.एन.बी.ईकीले, रमेश मुनीव आदींसह अन्य प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. आभार डॉ. बी.एम. जाधव यांनी मानले.

