Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बुगडीकट्टीच्या गिडमणी बहिण- भावाची कराटेमध्ये उत्तुंग भरारी

ब्लॅक बेल्ट (पहिला डॅन) चा मिळविला बहुमान


प्रीती व प्रेम यांनी गावचे, आई-वडिलांचे नाव केले लौकिक 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील बुगडीकट्टी या गावच्या प्रेम रणविजय गिडमणी व प्रीती रणविजय गिडमणी या भाऊ व बहिणीने कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट (पहिला डॅन ) ही पदवी मिळविली. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे त्यांना या पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाने गावचे नाव देशात चमकले आहे.




गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील हलकर्णी भागात शेवटच्या टोकाला असणारे बुगडीकट्टी हे गाव. हे दोघेही बहीण-भाऊ याच गावात लहानाचे मोठे झाले. प्रेम हा गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात तर प्रीती ही महागाव येथील जय भारत इंग्लिश मीडियम स्कूल येथे इयत्ता दहावीत शिकते. वडील रणविजय गिडमणी हे गडहिंग्लज एसटी आगारात सेवेत आहेत. या दोन्हीही मुलांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. ही त्यांची आवड ओळखून वडील रणविजय यांनी त्यांना कराटेचे प्रशिक्षण देण्याचे ठरविले. प्रेम व प्रीती  या दोन्ही मुलांनी देखील मोठ्या जिद्दीने व अपार कष्ट घेत वडिलांचे हे स्वप्न पूर्ण केले. बेळगाव, मुंबई, बेंगळूर, गारगोटी, गडहिंग्लज, कोल्हापूर, धाराशिव अशा विविध ठिकाणी कराटेमध्ये यश मिळवले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी कराटे प्रकारातील चांगल्यातले चांगले कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.




याचेच फळ म्हणून रायगड जिल्ह्यातील रोहा येथे अथक परिश्रम घेत त्यांनी ब्लॅक बेल्ट (पहिला डॅन ) ही पदवी दोघाही बहिण भावांनी मिळवत आपल्या गावाचे व आई-वडिलांचे नावलौकिक केले. रोहा येथील शिवनेरी कराटे महिला प्रशिक्षण बहुउद्देशीय संस्था येथे त्यांना ब्लॅक बेल्टने सन्मानित करण्यात आले. या दोन्ही मुलांना किशोर बागिलगेकर, चांदलाल शहा, मुकेश सिन्हा, प्राची सिन्हा यांचे मार्गदर्शन लाभले.



ब्लॅक बेल्ट (पहिला डॅन) ही नेमकी पदवी काय आहे?





कराटे प्रशिक्षण देताना विविध रंगांच्या बेल्ट वरून खेळाडूंची वर्गवारी केली जाते. यामध्ये  पांढरा बेल्ट म्हणजे नुकतेच प्रशिक्षणाला सुरुवात करणे, पिवळा बेल्ट म्हणजे थोडेफार प्रशिक्षण घेतलेला, केसरी बेल्ट म्हणजे काही प्रमाणात प्रशिक्षित, हिरवा बेल्ट म्हणजे नवीन तंत्र व कौशल्य शिकलेला, निळा बेल्ट म्हणजे कराटे बद्दल विशेष कौशल्य शिकलेला, लाल बेल्ट म्हणजे प्राविण्य प्राप्त खेळाडू, काळा बेल्ट म्हणजे विशेष प्राविण्य प्राप्त खेळाडू. ब्लॅक बेल्टमध्येच 'डॅन' या प्रकारातील 10 स्तर आहेत. पहिल्या पाच स्तरांना शोधन, संदान, योदान, गोदान असे संबोधण्यात येते. प्रीती व प्रेम या दोघांनीही पहिल्या डॅन मधील शोधन प्रकारात यश मिळवले आहे. ही पदवी मिळवणे म्हणजे कराटे प्रकारात अधिक कौशल्य प्राप्त करणे असा अर्थ होतो. त्यामुळे या दोन्ही बहीण भावांनी मिळवलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.