पर्यवेक्षक मोहन कांबळे यांचे प्रतिपादन
महागावच्या महात्मा फुले विद्यालयात वसुंधरा दिनानिमित्त व्याख्यान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): बदलत्या जागतिक वैश्विक तापमानामुळे वातावरणात बदल होत आहे.त्यामुळे ऋतुमान बदलले आहे. याचे कारण म्हणजे मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास केला आहे. विद्यार्थी हे भविष्यातील भारताचे सुजान नागरिक आहेत. म्हणून वसुंधरेला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पर्यवेक्षक मोहन कांबळे यांनी केले.
महागाव येथील महात्मा फुले विद्यालयातील हरित सेना विभाग व सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख उपस्थितीत वनपाल एस. एस. पाटील होते.
स्वागत व प्रस्ताविक प्रकाश चौगुले यांनी केले. यावेळी वनपाल एस.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना वनसंपदा वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करताना देशाच्या जडणघडणीत पर्यावरणाचे संवर्धन करत आपल्या परिसरातील वनक्षेत्र वाढवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच आपल्या अवतीभवती जंगलांना लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे सांगितले.
यावेळी वनपाल एस. एस. पत्की, रुबिना सोलापुरे, बी. एम. कुरबट्टे, संदेश कोकितकर, रमेश कळविकट्टे, कुलदिप देसाई, एकता पाटील, सुवर्णा शेवाळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष सुतार यांनी तर आभार किरण पाटील यांनी मानले.



