ठाकरे पक्ष शिवसेनेच्या वतीने पोलीस ठाण्याला निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शहरात संकेश्वर-बांदा महामार्गाच्या कामामुळे वाहतूक विस्कळीत बनली आहे. सदर वाहतूक नियंत्रित करून होणारी कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, शहरामध्ये गेल्या सहा महिन्यापासून महामार्गाचे काम सुरू आहे. रस्ते खुदाईमुळे शहरातील अंतर्गत रस्ते तसेच काही छोटे आड रस्ते बंद तर काही ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे वाहनधारकांची गोची होत आहे. गडहिंग्लज शहर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे महत्वाच्या कामासाठी अनेक तालुक्यातील लोक गडहिंग्लजला येत असतात. वीरशैव बँक ते चर्च रोड या रस्त्यावर वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहेत. पायी जाणाऱ्या लोकांना सुध्दा वाट मिळणे अवघड झाले आहे.
'मी पुढे, तु पुढे' करत वेगवान जाणाऱ्या दुचाकीस्वारांमुळे वाहतुक कोंडीत आणखी भर पडत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही समस्या सुरू आहे. महामार्ग करणारे कर्मचारी व पोलीस प्रशासन याच्यांत ताळमेळ नाही. सामाजिक काम म्हणून शहरातील ताहीर मकानदार यांनी विना मोबदला वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असताना देखील प्रशासन हे बघत बसले आहे. शहरातील वीरशैव चौक, दसरा चौक, चर्च रोड कार्नर या ठिकाणी वाहतुक पोलिसांची नेमणूक करून वाहन कोंडी दूर करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, प्रकाश पाटील, अमित कोरी, लक्ष्मण पाच्छापुरे यांच्या सह्या आहेत.

