हलकर्णी येथील शोकसभेत कै. सदानंद हत्तरकी यांना सर्वपक्षीयांनी वाहिली श्रद्धांजली
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भ्रमणध्वनीद्वारे हत्तरकी कुटुंबीयांचे सांत्वन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गोकुळ दूध संघाचा नावलौकिक देशभर करण्यात स्व. राजकुमार हत्तरकी यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या निधनानंतर सदानंद हत्तरकी यांनी त्यांचे विचार, आचरण व वारसा पुढे चालविला होता. समाजाच्या विकासासाठी ते सदैव झटत राहिले. कार्यकर्त्यांना एकसंघपणे ठेवण्याचे काम त्यांनी उत्तमपणे केले होते. सदानंद हत्तरकी यांच्या निधनाने जय-पराजय संयमाने स्वीकारत समाजाच्या विकासासाठी काम करणारे नेतृत्व हरपल्याची भावना सर्वपक्षीय नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी शोकसभेत व्यक्त केली.
वीरशैव बँकेचे चेअरमन, गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक, हलकर्णी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व हत्तरकी गटाचे नेते सदानंद हत्तरकी यांचे 3 एप्रिल रोजी निधन झाले. या पार्श्वभूमीवर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हलकर्णी येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी कै. सदानंद हत्तरकी यांच्या विविध आठवणींना उजाळा देण्यात आला.
प्रारंभी श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते कै. सदानंद हत्तरकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, जीवन शाश्वत नाही ते नश्वर आहे. शोकसभेमुळे आत्म्यास शांती मिळते. हत्तरकी गटाला ईश्वराने दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थना करत हत्तरकी गटाने दुःख विसरून पुढील वाटचाल करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
आमदार राजेश पाटील म्हणाले, सदानंद हत्तरकी जय-पराजय संयमाने स्वीकारून समाजाच्या विकासासाठी काम करीत राहिले. त्यांच्या निधनाने एक शांत व संयमी, समाजाच्या विकासासाठी काम करणारे नेतृत्व हरपले आहे.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, हत्तरकी कुटुंबाने महाडिक कुटुंबाला ३० वर्षे मोलाची साथ दिली आहे. सदानंद हत्तरकी यांच्या निधनाने आम्हाला मोठे दुःख झाले आहे. महाडिक कुटुंब हत्तरकी कुटुंबियांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहील.
यावेळी वरदशंकर वरदापगोळ, संग्रामसिंह कुपेकर, बाळेश नाईक, विद्याधर गुरबे, दिलीप माने, एल. टी. नवलाज, प्रा किसनराव कुराडे, उदय देसाई, प्रकाश चव्हाण, शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, मलगोंडा पाटील आदी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
या शोकसभेस जयकुमार मुन्नोळी, डॉ. गंगाधर व्हसकोटी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखाताई हत्तरकी, शिवशंकर हतरकी, उदय जोशी, माजी सभापती रूपाली कांबळे, सरपंच योगिता संगाज, उपसरपंच सलीम यमकनमर्डी, माजी सरपंच उमेश इंगळे, के. के.पाटील, भागोजी गवळी, प्राचार्य आर. एस. पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे, गटांचे, संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भ्रमणध्वनीद्वारे हत्तरकी कुटुंबियांचे सांत्वन
हलकर्णी येथे आयोजित शोकसभेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रमणध्वनीद्वारे हत्तरकी कुटुंबियांचे सांत्वन केले. सदानंद हत्तरकी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली.
व्हिडिओ येथे पहा 👇👇





