सभासदांची साखर आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
शिवाजीराव खोत यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले निवेदन
सखोल चौकशी करण्याचे प्रादेशिक सहसंचालकांचे विशेष लेखापरीक्षकांना निर्देश
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे तातडीने चाचणी लेखापरीक्षण करण्यात यावे अशी मागणी सभासदांनी साखर आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन शिवाजीराव खोत यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज साखर कारखान्यास कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सन 2023- 24 चा गळीत हंगाम चालू करण्यासाठी 5094.08 लाख रुपये इतके कर्ज मंजूर करून कारखान्यास वितरित करण्यात आलेले आहे. सदर कर्जाच्या विनीयोगाबाबत सकृत दर्शनी अनियमित्ता दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 5500.00 लाख इतके कर्ज तीन वेगवेगळ्या कारणांसाठी मे 2023 मध्ये मंजूर करण्यात आली असून कर्जाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या 29 अटींना बांधील राहून कर्ज वितरण केलेले आहे. त्या अटींच्या पूर्ततेविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही किंवा सदर साखर कारखान्याचे जिल्हा बँकेस सादर केलेल्या विनियोग पत्रात त्याचा कोणताही उल्लेख नाही. जिल्हा बँकेने मंजूर केलेली सदर कर्जे तोडणी वाहतूक, पूर्व हंगामी अल्पमुदत कर्ज, बिगर हंगामी कर्ज यासाठी मंजूर केलेली आहेत. सर्व कर्जे अल्पमुदतीची असताना एकूण कर्जापैकी 1693.05 लाख इतकी रक्कम डिस्टलरी प्रकल्पाच्या कंत्राटदारांना देण्यात आलेले आहे. हा नियमबाह्य खर्च असून त्यासाठी आवश्यक ते परवाने कारखान्याकडे नाहीत. अल्पमुदतीचे कर्ज अशाप्रकारे दीर्घ मुदतीच्या विनियोगासाठी वापरणे हे कारखान्याच्या हिताचे नसून आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे व दीर्घकालीन हानिकारक ठरणार आहे.
बॉयलर रिपेअर अँड मेंटेनन्स या खाली बिदर किसान एस एस के या कारखान्याला 224.20 लाख इतकी रक्कम अदा होणे हे अयोग्य आहे. सदर संस्थेचा एकूण आर्थिक परिस्थितीचा विचार करता व अन्य कारखान्याच्या तुलनात्मक कारखान्याने घेतलेले कर्ज आणि त्याचा विनियोग हा अवास्तव आहे. विनियोगाबाबत टेंडर प्रक्रिया राबविणे, संचालक मंडळाच्या मासिक मीटिंगमध्ये विषय पत्रिकेवर विषय घेऊन संचालक मंडळाला पूर्ण कल्पना देऊन चर्चा करून मंजुरी घेणे या प्राथमिक बाबींचीही पूर्तता केलेली नाही असे समजते. याची चौकशी झाली पाहिजे. विनियोगाबाबत आवश्यक त्या लेखापरीक्षणात्मक गोष्टीची पूर्तता याबाबतही अनियमितता झालेली आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार करता कर्जाच्या विनियोगाबाबतीत संस्थेचे चाचणी लेखा परीक्षण तातडीने करावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर शिवाजीराव खोत, आप्पासाहेब लोंढे आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान, तक्रार अर्जामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत सखोल चौकशी करून दिनांक 30 एप्रिल पर्यंत सदरचा चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी तृतीय विशेष लेखापरीक्षक डी बी पाटील यांना दिले आहेत.




