हेल्मेट सक्तीला संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेसह नागरिकांचा विरोध
उपविभागीय अधिकारी कार्यालयाला निवेदन देत वेधले लक्ष
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरामध्ये आज (शुक्रवार) पासून लागू करण्यात आलेला हेल्मेट सक्तीचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेसह नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करावे मात्र सक्ती करू नये असे या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज शहरातून संकेश्वर - आंबोली महामार्गाचे काम सुरू आहे. सुरुवातीपासून आम्ही सरकारकडे निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी रीतसर संपादन करून मोबदला देणे, तसेच जिथे रस्ता क्रॉस करावा लागतो तेथे हायवेवर प्रवेश करण्यासाठी व्यवस्था, गडहिंग्लज व आजरा शहराच्या हद्दीतून रस्ता करताना बायपासन रस्त्याची व्यवस्था करा अशी मागणी अनेकवेळा निवेदन देऊन केली आहे. मात्र याकडे डोळेझाक करून रस्ता बनवला जात आहे.
ग्रामीण भागामध्ये अनेक गावाच्या मधून महामार्ग गेला आहे, तिथे उड्डाणपुलाची गरज आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी अत्याळ - बेळगुंदी जवळ रस्ता पास करताना एका महिलेला जीव गमवावा लागला. चालत जाणारी महिला हेल्मेट घालू शकते का? हेल्मेटमुळे वाहन चालवणारा सुरक्षित राहील मात्र नागरीक, शालेय विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेसाठी जे उपाय करणे गरजेचे आहे त्याबाबत पोलिसांनी सरकारला अहवाल देऊन कंपनीला कामाबाबत पर्यायी मार्गाबाबत सूचना देणे गरजेचे आहे. तसेच शहरामध्ये वाहतूक कोंडी होते त्याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आवश्यक त्या प्रमाणात पोलिस नसल्याने बऱ्याच वेळा या समस्या निर्माण होतात. त्यामुळे पोलिसांची भरती करण्यासाठी सरकारनेही लक्ष देणे आवश्यक आहे.
कोल्हापूरमध्ये हेल्मेट सक्तीला विरोध करून नागरिकांनी दावा हाणून पाडला होता. आता तोच प्रयोग गडहिंग्लज मध्ये चालू करण्याचा प्रयत्न आहे. हायवेवर दीर्घ प्रवास करण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट असावे; मात्र सक्ती नसावी. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. याबाबत प्रबोधन आवश्यक आहे. मात्र हेल्मेट सक्ती करून गोरगरीब, शेतकरी, कामगार कामा निमित्त शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना विनाकारण त्रास दिला जाऊ शकतो. जनतेच्या भावना लक्षात घेऊन हेल्मेट सक्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर कॉम्रेड शिवाजी गुरव, प्रा. सुरेश वड्राळे, महादेव शिंगे, पिरगोंडा नाईक, कृष्णा रायकर, आप्पा नाईक, विनायक बडीगेर, अजित कणंगली, आझाद शेख, नागेश मनगुती, बाळकृष्ण रिंगणे यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत.

