परमपूज्य महेश आनंद उर्फ ईश्वर महास्वामीजी यांचे प्रतिपादन
गडहिंग्लज येथील श्री संत बाळूमामा व हालसिद्धनाथ मंदिर संस्थान येथे प्रवचन सोहळा संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भूमीवर वाहणारी गंगा भूमीला समृद्ध करते तर गुरुमुखातून वाहणारी ज्ञानगंगा भक्ताच्या मनाला समृद्ध करते, म्हणूनच आपण गुरुचरणी लीन होऊन भक्ती केली पाहिजे. असे प्रतिपादन परमपूज्य महेश आनंद उर्फ ईश्वर महास्वामीजी यांनी केले.
गडहिंग्लज येथील श्री संत बाळूमामा व हालसिद्धनाथ मंदिर संस्थान येथे प्रवचन सोहळा संपन्न झाला. यावेळी ते भक्तांना मार्गदर्शन करत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना परमपूज्य महेश आनंद उर्फ ईश्वर महास्वामीजी पुढे म्हणाले, भक्तांचा उद्धार करण्यासाठी खांद्यावर घोंगडं, हातात काठी व रानावनात अनवाणी फिरून बाळूमामानी जगाचा उद्धार केला, म्हणून ते देव झाले. संसारामध्ये आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी भगवंताला जिंकले पाहिजे. जिथे लक्ष्मी तिथे गरीबी नसते. भगवंत म्हणजे दयेचा सागर, अनाथांचा नाथ आहे. देवाने केलेली कृपा, आशीर्वाद चिरकाल टिकणारे असते. पण त्यासाठी निस्सीम भक्ती करावी लागते, असा महानमंत्र महास्वामीजीनी यावेळी दिला.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक श्री संत बाळूमामा व हालसिद्धनाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी केले. त्यानंतर आचारी बाळासाहेब कुरबेट्टी, सहदेव काडापुरे, महादेव काडापुरे, बाळूमामाभक्त बाळूमामा काडापुरे, कल्लाप्पा मोर्ती, महादेवी कोड्ड, अर्जुन भोईटे, राजू पोवळ, जयसिंग पोवार, अरविंद पाटील, विठ्ठल भमानगोळ, अनिल पाटील, श्रीपती पाटणे व अन्नछत्रातील सर्व सेवेकरी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जवाहर घुगरे, चंद्रकांत सावंत, संदीप संदीप रिंगणे, अमोल देवगोंडा व सर्व बाळूमामा भक्तांनी परिश्रम घेतले आज गुरुवारी पालखी परिक्रमा व रात्री भगवान डोणे महाराज वाघापूर यांच्या भाकणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला. आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर खवरे यांनी केले. आभार विठ्ठल भमानगोळ यांनी मानले.





