कोल्हापूर विभाग दुसऱ्या स्थानावर
कोकण विभागाचा सर्वाधिक 99.01 टक्के निकाल
नागपूरचा विभागाचा 94.73 टक्के इतका सर्वाधिक कमी निकाल
राज्याचा एकूण 95.81 टक्के निकाल
दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार
पुणे : इयत्ता दहावी परीक्षेचा राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला असून या निकालात देखील कोकण विभागाचा सर्वाधिक 99.01 टक्के इतका निकाल लागला आहे. सर्वात कमी नागपूर विभागाचा 94.73 टक्के इतका निकाल लागला आहे. बारावी प्रमाणे दहावी परीक्षेत देखील मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के इतका लागला आहे. त्यामुळे मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे 2.65 टक्क्यांनी वाढले आहे. एकूण निकालात देखील यंदा 1.98 टक्क्यानी वाढ झाली आहे. 72 विषयांपैकी 18 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. राज्यात 187 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली. दुपारी एक वाजता संकेतस्थळावर ऑनलाईन विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
विभागनिहाय निकाल असा - पुणे 96.44, नागपूर 94.73, छत्रपती संभाजीनगर 95.19, मुंबई 95.83, कोल्हापूर 97.45, अमरावती 95.58, नाशिक 95.28, लातूर 95.27, कोकण 99.01 टक्के इतका निकाल लागला आहे.
9382 शाळांचा निकाल शंभर टक्के
राज्यातील 9382 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये पुणे विभागात 1542, नागपूर 1007, छत्रपती संभाजी नगर 840, मुंबई 1533, कोल्हापूर 1270, अमरावती 1063, नाशिक 1006, लातूर 608 तर कोकण विभागातील 513 शाळांचा समावेश आहे. राज्यातील 38 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

