कार्यालयाशी संपर्क साधत महिलांनी कागदपत्रे केली जमा
राम मंदिरात बैठक घेत महिलांना केले मार्गदर्शन
लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथे ठाकरे पक्ष शिवसेनेच्या वतीने विश्वकर्मा योजने संदर्भात लाभार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ऑनलाइन अर्ज करून देखील लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. दीडशे महिलांनी कार्यालयाशी संपर्क साधत कागदपत्रे जमा केली, अशी माहिती उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांनी दिली आहे.
केंद्र शासनाने 13 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना शिलाई मशीनसह अन्य यंत्रसामुग्री घेण्यासाठी पंधरा हजार रुपये, ट्रेनिंग भत्ता पाचशे रुपये, कर्ज लाख रुपये असे विविध लाभ मिळणार आहेत. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बारा बलुतेदार लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत, पण तरी देखील अर्जदारांना अजून लाभ मिळाला नाही. या संदर्भात ठाकरे पक्ष शिवसेना उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी व करवीर उपतालुकाप्रमुख अभिजित पाटील यांनी जिल्हा उद्योग भवनकडे निवेदन देऊन लक्ष वेधले होते. त्यानंतर सकारात्मक चर्चा झाल्याने पुढील योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना कागदपत्रे घेऊन संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. या अवाहनास प्रतिसाद देत आजपर्यंत शिलाई मशीनसाठी दीडशे महिलांनी ठाकरे पक्ष शिवसेना कार्यालयाकडे कागदपत्रासह रजिस्टर नंबर सादर केले आहेत. या संदर्भात राम मंदिरात बैठक देखील पार पडली.
यावेळी विनायक तेली, विवेक पाटणे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. लवकरच शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या मदतीने प्रशिक्षणासह योजनेचा लाभ देऊ असे आश्वासन शिवसेना उपशहरप्रुख काशिनाथ गडकरी यांनी दिले. यावेळी लता गोरुले, प्रियंका पोवार, श्रीदेवी गडकरी,शामल कळसाणावर, तेजस्वीनी नरके उपस्थित होते.

