७ हजार कि.मी.चा प्रवास सुशील सावंत याने मोठ्या धाडसाने केला पार
हिमालयाच्या पर्वत रांगांमधील लोकांशी साधला संवाद
गडहिंग्लज (प्रतिनिधी): म्हटले जाते की, माणसाजवळ प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ऊन, वारा असो वा पाऊस याची तमा न बाळगता या इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या ध्येयापर्यंत माणूस पोचू शकतो. याचेच उदाहरण म्हणजे गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथील सुशील सावंत या शेतकरी कुटुंबातील तरुणाचे देता येईल. कारण या तरुणाने चक्क दुचाकीवरून 'गडहिंग्लज ते नेपाळ' हा तब्बल सात हजार कि.मी.चा प्रवास केला आहे. या प्रवासाच्या माध्यमातून हिमालयाच्या पर्वतरांगांमधील विविध लोकांशी त्यांनी संवाद साधत एक वेगळा अनुभव मिळवण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
सुशील या तरुणाला प्रवासाची आवड आहे. न थकता व नाउमेद न होता भारतभ्रमंतीचा निर्धार त्याने मनात बाळाला आहे. याचाच एक भाग म्हणून त्याने आपल्या दुचाकीवरून गडहिंग्लज ते नेपाळपर्यंतचा प्रवास बारा दिवसांत पूर्ण केला आहे. सुशील याने महाराष्ट्रातून मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, अयोध्या, सोनोली बॉर्डर, इंडो-नेपाळ बॉर्डर, काठमांडू, पोखरा ते मुस्तांग मुक्तीनाथ मंदिर असा हिमालयाच्या खडतर पर्वतरांगातून मोठ्या धाडसाने प्रवास केला. यापूर्वी त्याने काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल, केरळ, कन्याकुमारी, तमिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांचाही दुचाकीनेच प्रवास केला आहे. या प्रवासासाठी त्याला केरबा कुरणकर यांची साथ लाभल्याचे तो सांगतो. त्यांच्या सहकार्यामुळेच प्रवासात ऊर्जा मिळाल्याचे तो म्हणतो.
या प्रवासाबद्दल बोलताना सुशील सावंत म्हणतो, प्रवास करताना नवनवीन माणसे भेटतात.यामुळे नवीन अनुभव येतात. या माध्यमातून कल्पनेला चालना मिळण्यास मदत होते. यामुळे आपण भारत भ्रमंतीचा संकल्प केल्याचे त्याने सांगितले.
व्हिडिओ येथे पहा 👇



