Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गजरगाव शाळेतील माजी गुरु- शिष्यांनी ३४ वर्षानंतर उलगडला आठवणींचा पट!



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आज धकाधकीच्या जीवनात संवाद हरवत चालला आहे. व्यापामुळे स्नेह देखील  दुरापास्त होत असल्याचे चित्र आहे. मात्र याला आजरा तालुक्यातील गजरगाव येथील श्री सरस्वती विद्यामंदिर शाळेतील १९८९-९० या सालातील इयत्ता सातवीच्या माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी मात्र अपवाद ठरले आहेत. तब्बल ३४ वर्षानंतर पुन्हा याच शाळेत स्नेह मेळाव्याचे आयोजन करत मैत्रीचे धागे किती घट्ट असतात आणि गुरूंचा सहवास किती प्रेरणादायी असतो हे दाखवून दिले आहे.



हा स्नेहमेळावा घेण्यापूर्वी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी माजी विद्यार्थ्याने व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. प्रत्येकांना या ग्रुपवरून  वेळोवेळी माहिती देण्यात आली. सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला हजर राहून कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याचे ठरविले. त्यावेळी ज्ञानदानाचे कार्य केलेल्या   आपल्या गुरूंशी प्रत्यक्ष व दूरध्वनी संपर्क साधून या स्नेहमेळाव्याची माहिती देण्यात आली. गुरूंनी देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याची ग्वाही दिली. या सर्व  प्रयत्नाला सर्वांनी आपापल्या परीने मोलाचे सहकार्य दिले. मधुकर मिसाळ, बसवंत शिंदे, संभाजी पाटील या गुरुजींचा विशेष सत्कार शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह देवून करण्यात आला. 




प्रारंभी दिवंगत गुरुजी, क्लासमेट परिवारातील दुःखद निधन झालेल्यांना उत्तम केसरकर यांनी श्रद्धांजली प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली वाहिली. स्वागत विठ्ठल पाटील यांनी केले.यावेळी वर्ग मैत्रिणींचा शिक्षकांच्या हस्ते साडी, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  




यावेळी सर्व गुरुवर्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये 1989 - 90 चे सातवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या आमच्या या विद्यार्थ्यांनी जाणीवेने शिक्षण घेऊन त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिकण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले म्हणूनच ते खऱ्याअर्थी घडले. जे विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेली प्रगती खरोखरच मोलाची आहे. 34 वर्षापूर्वीचे विद्यार्थी आम्ही यांना शिक्षक म्हणून लाभलो, आणि त्यांनी आमच्या ज्ञानार्जनातून विविध क्षेत्रात प्रगतीपथावर कार्यरत आहेत हे ऐकून  खरोखर धन्य वाटले. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांनी ३४ वर्षानंतर  आपण जिथे नोकरीची सुरुवात केली या सरस्वतीच्या ज्ञान मंदिरात पुन्हा बोलावून सेवानिवृत्तीनंतर आमचा विशेष सत्कार करून आमच्याशी जपलेला ऋणानुबंध  हा  आम्हाला ऊर्जा देणारा ठरला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



यावेळी सर्व वर्गमित्र-मैत्रिणींनी  त्यावेळची ओळख सांगून सध्या काय करीत आहोत तसेच आपली आजची नवी ओळख त्यावेळच्या आठवणी सांगितल्या. त्या मेळाव्याचे सारथ्य किशोर पाथरवट यांनी केले. विठ्ठल पाटील, रावसाहेब पालकर, अरुण चोथे, मोहन कांबळे, अर्जुन पाटील, संजय कांबळे, श्रावण देसाई, कृष्णा मोहिते, रामदास खुळे, शामराव लांडे, मारुती पाटील, गणपती संकपाळ, उत्तम केसरकर, नामदेव पाथरवट, शांताराम आसबे, मनोहर पालकर, मंगल पाटील, संपूर्णा लांडे, सुरेखा पाटील, अरुणा शिंत्रे, आशा चव्हाण जयश्री भाटले, सुधा शिंत्रे, रेखाताई पाटील, बेबीताई पाटील, माया रेडेकर, अंजना लांडे यांच्यासह वर्ग मित्र- मैत्रिणीनी दिलेले सहकार्य मोलाचे ठरले. या संवाद मेळाव्यास क्लासमेंट परिवारातील वर्गमित्र -मैत्रिणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कलकुटकी यांनी केले. अरुण चोथे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.