Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वय वर्षे १०२, डोळ्याला पूर्णतः अंधत्व तरीदेखील तिने बजावला मतदानाचा हक्क!

भडगावात १०२ वर्षीय शिवूबाई गुरव आजीच्या जिद्दीला सर्वांचा सलाम 


मतदान करत डोळसांना दिला मतदानाचा संदेश 


पिंक केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून श्रीमती गुरव यांचा प्रमाणपत्र देत करण्यात आला विशेष सन्मान  




भडगाव : नातू धोंडीबा गुरव व सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक यांच्या मदतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर चालत येताना १०२ वर्षीय शिवूबाई गुरव.


गडहिंग्लज (संतोष नाईक ) : वय वर्ष १०२, डोळ्याला पूर्णतः अंधत्व आलेले. केवळ आवाजावर व अंदाजावरच घरात वावरणे. शंभरी पार करून देखील न खचता न डगमगता डोळसांना देखील आश्चर्य वाटणारे जीवन जगणाऱ्या गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव या गावातील शिवूबाई धोंडीबा गुरव या आज्जीने आज लोकसभेसाठी मतदान केंद्रावर येत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. डोळ्याला अंधत्व असून देखील एक जागरूक मतदाराचे कर्तव्य बजावत आज्जीने डोळसांना मतदान करणे किती महत्त्वाचे आहे, हा संदेश दिला आहे.



लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून जनजागृती करण्यात येत आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी यांनी गावोगावी रॅली, पथनाट्य सादर करून मतदार जनजागृती कार्यक्रम राबविला आहे. याचाच परिणाम म्हणून यंदा लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का देखील वाढण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत. उर्वरित टप्प्यांमध्येही निवडणुकीची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. मतदानासाठी दिव्यांग, अंध बांधव, वयोवृद्ध मतदार यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे. दरम्यान, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, तत्कालीन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दोन महिन्यापूर्वी गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव या गावाला भेट देऊन मतदान केंद्रांची पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान ठाकरे पक्ष शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख व सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, तलाठी सौ. रूपाली कांबळे यांनी गावामध्ये १०२ वर्षीय महिला मतदार असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शंभरी पार मतदारांचा विशेष सन्मान करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक यांच्या मदतीने वयोवृद्ध शिवूबाई नाईक यांना मतदानाचे कर्तव्य पार पाडता आले. मतदान केंद्रावर त्यांचा यथोचित सन्मान देखील करण्यात आला.




भडगाव येथील प्रभाग क्रमांक ७८ मधील शिवुबाई धोंडिबा गुरव या वयोवृद्ध आजीने मतदान केंद्रावर येत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी या १०२ वर्षीय महिला मतदाराच्या घरी भेट देऊन विनंती करत मतदान केंद्रावर रिक्षाद्वारे आणले. मतदान केंद्रावर आल्यानंतर शिवबाई गुरव यांनी चालत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली. मुळात विशेष बाब म्हणजे शिवूबाई गुरव यांना डोळ्याने दिसत नसताना सुद्धा मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य पार पाडले. सामाजिक कार्यकर्ते  व ठाकरे पक्ष शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  केलेल्या जनजागृतीमुळे व प्रयत्नामुळे १०२ वर्षीय महिला मतदाराला आपल्या मतदानाचा हक्क बजावत आला.


भडगाव : १०२ वर्षीय महिला मतदार शिवूबाई गुरव आजीचा प्रमाणपत्र व शाल देऊन विशेष सन्मान करताना कृषी सहाय्यक तथा बीएलओ अनिल कांबळे, तलाठी सौ. रूपाली कांबळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, नातू धोंडीबा गुरव. 

 

याबद्दल शिवूबाई गुरव यांचा येथील पिंक केंद्रावरील सर्व महिला अधिकारी यांच्या उपस्थितीत शाल, प्रमाणपत्र व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी तलाठी सौ. रुपाली कांबळे, कृषी सहाय्यक अनिल कांबळे, आजीचे नातू धोंडिबा गुरव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.