मुगळीतील न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या आठवणी
तब्बल 33 वर्षानंतर 1990- 91 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सकाळी पावणे पाच वाजता डेअरीचा भोंगा व्हायचा आणि आमचे सर नदीला आंघोळीला जायचे. ते वाटेत भेटले तर आम्ही घाबरायचो. त्यावेळी रात्रीच्या अभ्यासिका, जनावरांना चारा आणून टाकायचं, शेतीची कामे करायची आणि सरांच मार खायचं. पाटील, आरबोळे, माने, मुसळे यांच्या घरात शाळा भरायची. त्यानंतर मात्र आम्ही नवीन शाळा इमारतीतचे साक्षीदार झालो आणि आम्हा सर्वांचे दहावीचे शिक्षण पूर्ण झाले... या सर्व आठवणी जागवल्या गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या 1990- 91 सालच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी. निमित्त होते तब्बल 33 वर्षांनी पार पडलेल्या स्नेहमेळाव्याचे.
मुगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल 33 वर्षांनी पार पडला. अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक विठ्ठल भमानगोळ होते. यावेळी एस. एन. कुटे, श्री. जडे, सुनिल सागर, अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्नेहमेळाव्यात या माजी विद्यार्थिनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्वागत रमेश भोसले यांनी तर प्रास्ताविक बसवंत भोसले यांनी केले. प्रारंभी हयात नसलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हस्ते माजी शिक्षकांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री. भमानगोळ म्हणाले, 1980 साली शाळेचा निकाल झिरो टक्के लागला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी मुगळी हायस्कूलला कुलूप लावले आणि आमची बदली मुगळी शाळेत झाली. आम्ही मोठ्या धाडसाने शाळेचे कुलूप काढले. आम्हाला ग्रामस्थांनी काही प्रश्ने विचारली त्यांना आम्ही समाधानकारक उत्तर दिल्याने शाळा भरविण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत ही शाळा उत्तम चालली आहे. या शाळेने चांगली गुणवत्ता निर्माण केली आहे. आई-वडिलांची सेवा करा परमेश्वर तुम्हाला तेथेच भेटेल असे आवाहन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी बसवंत भोसले, रमेश भोसले, विजय महाडिक, श्रीपाद स्वामी, काशिनाथ मुसळे, राजेंद्र शिडलाळे या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांनी देणगी शाळेकडे सुपूर्द केली.
कार्यक्रमास बसवराज चौगुले, अशोक चौगुले, रामकृष्ण मुसळे, राजेंद्र मांग, मनोहर वाघ, वनिता खडके, सुनीता भोसले, ललिता भोसले, मीनाक्षी शिंदे, निंगाप्पा पाटील, निजगोंडा पाटील, श्रीपाद स्वामी, बसवंत भोसले, विजय महाडिक, रमेश भोसले, काशिनाथ मुसळे, राजु शिडलाळे यांच्यासह माजी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. आभार वनिता खडके यांनी मानले.







