महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण परीक्षेत राज्यात 13 वी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा लेखापरीक्षण परीक्षेत गडहिंग्लज तालुक्यातील वडरगे गावची सुकन्या कु. अंजली दत्तात्रय हजारे हिने राज्यात तेरावा क्रमांक मिळविला.
अंजलीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण एम आर हायस्कूल तर उच्च माध्यमिकचे शिक्षण जागृती ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. कमला कॉलेज कोल्हापूर येथून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने जिद्दीने अभ्यास केला. वडील दत्तात्रय हे शेती व कराटेचे वर्ग तर आई सौ सुरेखा गृहिणी आहेत.
काही महिन्यापूर्वीच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुंबई येथील मंत्रालयात लिपिक पदी नियुक्ती झाली होती. नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ जुळवत अंजलीने महाराष्ट्र राज्यात अव्वल क्रमांक मिळविला. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आई वडील व गुरुजनांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभल्याचे अंजलीने सांगितले.


