चन्नेकुपी येथील बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह
वरिष्ठ नेते मंडळींकडे उमेदवारीची मागणी करण्याचा निर्णय
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने चंदगड विधानसभा मतदारसंघाची आगामी निवडणूक लढविण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सभापती अमरसिंह चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी बैठकीत धरला.
मौजे चन्नेकुप्पी (तालुका गडहिंग्लज) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा आगामी विधानसभा निवडणूक व त्या संदर्भातील प्राथमिक चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली. यामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जिल्हा अध्यक्ष व्ही.बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्याचबरोबर पक्ष स्थापनेपासून आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ असणारे व शरदचंद्र पवार यांचे विचार तालुक्यातील गावागावात पोहोचवणारे नेतृत्व, माजी सभापती म्हणून अतिशय प्रभावीपणे कामकाज करून जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण करणारे व गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना तसेच संजय गांधी निराधार योजना अध्यक्षपदाच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब जनतेची सेवा करणारे, प्रशासनाचा तंतोतंत अभ्यास करून प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करणारे माजी सभापती अमरसिंह चव्हाण यांनी चंदगड विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवावी असा एकमुखी आग्रह सर्व कार्यकर्त्यांनी धरला.
यावेळी कार्यकर्त्यानी मनोगते व्यक्त करून पक्षाची ध्येय धोरणे व चंदगड विधानसभेच्या विकासात्मक राजकारणासाठी अभ्यासू व कणखर अशा नेतृत्वाची गरज असल्याने अमरसिंह चव्हाण यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष शिवप्रसाद तेली व तालुका अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी प्रदेश पातळीवरील नेते मंडळींशी चर्चा करून लवकरच विधानसभेच्या कामाला सुरुवात करू असे आश्वासन दिले. त्याचबरोबर नेतेमंडळींची भेट घेऊन अमरसिंह चव्हाण यांच्या उमेदवारीचा शब्द घेऊन येऊ असेही सांगितले. यावेळी तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.



