Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज उपविभागातील वाढत्या चोऱ्या, अवैध धंद्यांना पायबंद घाला!

ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन 







गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज उपविभागातील वाढत्या चोऱ्या व अवैध धंद्यांना पायबंद घालण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेकडून  कठोर पावले उचलण्यात यावीत अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.  




या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड हे तालुके सुसंस्कृत व शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जातता. गडहिंग्लज शहर तर शैक्षणिक व वैद्यकीय हब असणारे शहर म्हणून आता नावरूपास येत आहे. मात्र सध्या  या ठिकाणी चोऱ्या, अवैध धंद्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र असल्याने या शहरांच्या नावलौकिकाला व येथील संस्कृतीला डाग लागत आहे. सात आठ महिन्यापूर्वी गडहिंग्लज शहरात चोऱ्यांचे सत्र मोठ्या प्रमाणात घडले होते. या पाठोपाठच चेन स्नॅचिंग,  हातचालकीने फसवणूक करत सोन्याचे दागिने लांबविण्याचे प्रकार शहरात घडले होते. या पाठोपाठच चंदगड तालुक्यातील कागणी, कोवाड, तेऊरवाडी या ठिकाणी देखील चोरीच्या घटना घडल्या आहेत. या चोरी प्रकरणातील चोरटे मोकाट असून अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. 



गेले सात-आठ महिने गडहिंग्लज शहरासह तालुक्यात चोऱ्यांचे सत्र थांबले होते. मात्र आता पुन्हा शहरासह तालुक्यात चोरटे सक्रिय झाल्याचे दिसत आहे. कारण गेल्या पंधरा दिवसात या चोरट्यानी तालुक्यातील इंचनाळ, हरळी खुर्द, गडहिंग्लजनजीक मुमेवाडी या ठिकाणी घरफोडी करत सोन्याचे ऐवज व लाखो रुपयांची रोकड दिवसाढवळ्या लंपास केली आहे. गुरुवारी तर या चोरट्यांनी गडहिंग्लज शहरातील अर्बन कॉलनीत बंद घर फोडून बंदुकीचा धाक धाकवत चोरीचा प्रयत्न केला आहे. आता बंदूक वापरण्या इतपत या चोरट्यांची मजल गेल्याने गडहिंग्लज शहराचे बिहार होत आहे का? असा प्रश्न पडला आहे. दिवसाढवळ्या चोरट्यांकडून बंद घरे टार्गेट केली जात आहेत याचा अर्थ चोरट्याना पोलिसांचा धाकच नसल्याचे दिसत आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे शहर व तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरासह तालुक्यात एवढ्या चोऱ्या होऊन देखील या चोऱ्यांचा छडा का लागत नाही ? ही बाब अत्यंत खेदजनक आहे. 



या पाठोपाठच गांजा, मटका, गोवा बनावटीची दारू विक्री हे अवैद्य धंदे जोरात सुरू आहेत. या अवैद्य धंद्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन बनत असून त्यांचे आयुष्य देखील उध्वस्त होत आहे. या अवैद्य धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी अभय का दिले जात आहे? हा प्रश्न देखील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. त्याचबरोबर लॉज व कॅफेंमध्ये देखील अवैध धंदे सुरू आहेत. यामध्ये तरुणाई दिवसेंदिवस गुंतत असल्याचे दिसते.  काही लॉज व कॅफेंमध्ये छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू आहेत. याचीही पोलीस यंत्रणेने चौकशी करून येथील अवैध धंद्यांना पायबंद घालण्याची गरज आहे. सुसंस्कृत गडहिंग्लज उपविभागाला बदनाम करणारे हे धंदे पोलिसांनी वेळीच रोखावेत. अशी मागणी या निवेदनातून केली आहे.




निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, युवासेना विस्तारक डॉ. सतीश नरसिंग, तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, कागल तालुका प्रमुख जयसिंग टिकले, जिल्हा युवा सेना अधिकारी अवधूत पाटील, तालुका संघटिका ॲड. स्नेहल पाटील, चंदगड तालुका संघटक विक्रम मुतकेकर आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.