Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील हे शेवटचं आंदोलन, आता आमदार, मंत्र्यांनी नांगनूर बंधाऱ्यावरच यायचं !

हिरण्यकेशी नदीतील दूषित पाणीप्रश्नी माजी सभापती अमर चव्हाण यांची आक्रमक भूमिका 


नांगनूर, खणदाळ, अरळगुंडी, कडलगे, इदरगुच्ची ग्रामस्थांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा 


ठोस कारवाई करा अन्यथा टोकाची भूमिका घेऊ : डॉ. नंदाताई बाभूळकर 


                                           छायाचित्रे  : मज्जिद किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीतील दूषित पाणी प्रश्नी गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर, खणदाळ, अरळगुंडी, कडलगे, इदरगुच्ची या पाच गावच्या ग्रामस्थांनी आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. नदीचे पाणी दूषित करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कर्नाटकातील  संकेश्वर साखर कारखाना व नगरपालिकेवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. गेली पंधरा वर्षे झाली विविध मार्गाने लढा देऊन देखील ठोस कारवाई होत नाही त्यामुळे कुटुंबीयांसह प्रांत कार्यालयाच्या दारातच जीवन संपवण्याचा विचार करावा लागेल असा इशारा देखील या पाच गावातील ग्रामस्थांनी यावेळी शासनाला दिला. माजी सभापती अमर चव्हाण, डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत निर्णयाचा शेरा लागत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच असेल असे सांगतानाच गडहिंग्लजमधील हे आता शेवटचे आंदोलन आहे. आमदार व मंत्र्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी नदी बघून गेले आहेत, मात्र यावर कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही.आता येथील जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. यापुढे आमदार, मंत्र्यांनी गरज असेल तर आता नांगनूर बंधाऱ्यावरच यायचं, आम्ही तुमच्यासाठी पैसे खर्च करून गडहिंग्लजला येणार नाही. यापुढील आंदोलने ही नांगनूर  बंधाऱ्यावरच होतील असा इशारा देत अमर चव्हाण यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. दरम्यान, याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना देण्यात आले. 



येथील श्री महालक्ष्मी मंदिरापासून या मोर्चाला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. संकेश्वर पालिकेवर कारवाई झालीच पाहिजे, हिरण्यकेशी प्रदूषणमुक्त झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. प्रांत कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.



यावेळी बोलताना माजी सभापती अमर चव्हाण म्हणाले, हिरण्यकेशी नदीतील दूषित पाणी प्रश्नासाठी नांगनूरसह परिसरातील पाच गावचे लोक गेली पंधरा वर्षे शासन दरबारी लढा देत आहेत. हिरण्यकेशी प्रदूषणमुक्त करा अशा मागणीचे ठराव या ग्रामपंचायती वारंवार करून न्याय मागत आहेत. मात्र पदरी निराशेशिवाय काही पडलेले नाही. विविध लोकप्रतिनिधींनी या दूषित पाण्याची परिस्थिती आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, मात्र कोणतीच ठोस कृती आजतागायत झालेली नाही. आता येथील नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळे यापुढे आम्ही लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना गडहिंग्लजला बोलावणार नाही तर आता त्यांना नांगनूर बंधाऱ्यावरच यायला भाग पाडू, ह्या पुढील आंदोलने तेथेच होतील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.




अन्यथा आम्ही टोकाची भूमिका घेऊ  : डॉ. नंदाताई बाभुळकर 



डॉ. नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, हिरण्यकेशी नदीमुळे तालुक्यातील शेती फुलली, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, मात्र शेजारच्या कर्नाटक राज्यातील साखर कारखाना व नगरपालिका हे पाणी प्रदूषित करून येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. हिरण्यकेशी नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी गेली पंधरा वर्षे पाच गावच्या ग्रामस्थांचा लढा सुरू आहे मात्र शासन पातळीवरून कोणतीच गंभीर दखल घेतली जात नाही. केवळ न्यायालयाने दखल घेत प्रतिसाद दिला आहे. कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्याच्या दोन्हीही पालकमंत्र्यांनी या प्रश्नासाठी प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावून तातडीने यावर तोडगा काढण्याची गरज आहे. यावर तातडीने कार्यवाही न झाल्यास प्रसंगी आम्ही टोकाची भूमिका घेऊ असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, संजय तर्डेकर यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी मनोगते व्यक्त केली.




या मोर्चात अमृत शिंत्रे, बाळगोंडा पाटील, शाहू मोकाशी, शिवाजीराव माने, गुरुराज हत्ती, बसवराज हंजी, कॉ. संपत देसाई, संजय तर्डेकर, शिवप्रसाद तेली, उदयराव जोशी, अंकुश रणदिवे, शिवाजी पाटील, रामचंद्र मोकाशी, श्रद्धा मोकाशी, अण्णासाहेब पाटील,  सुनिता लोहार, प्रियांका सुतार, श्रीदेवी कांबळे, मीना सुतार, फुलावती नाईक, प्रमिला रेडेकर, पद्मश्री नासीपुडे, सीमा मोकाशी, विद्या लोहार, दीपा पाटील यांच्यासह पाच गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.