प्रा. किसनराव कुराडे यांचे खासदार श्री शाहू छत्रपती यांना निवेदन

गडहिंग्लज : येथील कार्यक्रमाप्रसंगी खासदार श्री शाहू छत्रपती यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करताना प्रा. किसनराव कुराडे.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे मार्गांची पूर्तता करून घ्यावी अशी मागणी थोर विचारवंत, लेखक प्रा. किसनराव कुराडे यांनी कोल्हापूरचे नूतन खासदार श्री शाहू छत्रपती यांच्याकडे निवेदनातून केली आहे. खासदार श्री शाहू छत्रपती गडहिंग्लज दौऱ्यावर होते या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेऊन प्रा. कुराडे यांनी निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, ज्यावेळी ब्रिटिशांनी मुंबई-बेंगलोर रेल्वे मार्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तत्कालीन छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी हा रेल्वे मार्ग व्हाया कोल्हापूरमार्गे नेण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर घटप्रभा - सावंतवाडी व्हाया चंदगड, घटप्रभा आंबोली व्हाया - गडहिंग्लज, कोल्हापूर - कोकण व्हाया गगनबावडा आणि कोल्हापूर- बेळगाव व्हाया संकेश्वर अशा चार उप रेल्वे मार्गांचे आराखडे तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असा आग्रह शाहू महाराजांनी धरलेला होता. परंतु दुर्दैवाने त्यांच्या वयाच्या फक्त ४८ व्या वर्षी अकाली निधन झाल्यामुळे त्यांचे हे स्वप्न अपुरे राहिले. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर शासकीय यंत्रणांनी या मार्गाचे सर्व्हेक्षण केलेले आहे. परंतु अद्याप पूर्तता केली नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने आपण स्वतः लक्ष घालावे व थोरल्या महाराजांचे स्वप्न साकार करावे व वाहतूक क्रांती घडवून आणावी अशी मागणी प्रा. कुराडे यांनी केली आहे.
