गडहिंग्लज येथे शिवसेना ठाकरे पक्ष पदाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय
प्रदूषण करणाऱ्या घटकांची महिन्याभरात माहिती संकलित करणार
गडहिंग्लज पंचायत समिती सभागृहात पार पडली बैठक
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आजरा, चंदगड, गडहिंग्लज, मुरगुड, भुदरगड नगरपालिका व नगरपरिषद हद्दीतील हिरण्यकेशी, घटप्रभा, मलप्रभा, तिलारी, मार्कंडेय, चित्री या नद्यांमध्ये होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूरच्या पंचगंगा नदीसाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजना या नद्यांसाठीही राबविण्यासाठी 'पंचगंगा मॉडेल' राबविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यासाठी महिन्याभरात प्रदूषित करणाऱ्या घटकांची माहिती गोळा करून यावर प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिकांचे अधिकारी व शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गडहिंग्लज पंचायत समितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी या नद्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातून घरगुती सांडपाणी नदीत मिसळून नद्या प्रदूषित होत असल्याबद्दलची तक्रार दोन महिन्यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आज ही बैठक पार पडली. या बैठकीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, गटविकास अधिकारी शरद मगर यांचे प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप माने यांच्या हस्ते प्रादेशिक अधिकारी श्री. साळुंखे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, नद्यांच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न सध्या निर्माण होत आहे. औद्योगिक संस्था, नागरी वस्त्यांसह वैद्यकीय कचरा, पोल्ट्री, हॉटेल व्यवसाय इतर घटकांकडून नद्यांचे प्रदूषण केले जात आहे. हे प्रदूषण वाढण्यापूर्वीच काळजी घेतल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळाने योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी केली.
यावेळी नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांनी कोल्हापूर येथील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकी दिली. विविध अकरा मुद्द्यांवर भर देत हे प्रदूषण कसे कमी करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नद्यांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी शहराला लागून असणाऱ्या ग्रामपंचायती, साखर कारखाने, औद्योगिक वसाहत, शेती व खणीकर्म या चार घटकांच्या माध्यमातून नद्यांमधील पाणी प्रदूषण होत असते. या घटकांकडून केले जाणारे पाणी प्रदूषण कसे रोखता येईल याची माहिती घेण्यात यावी. या माध्यमातून नदीत मिसळणारे सांडपाणी, कचरा याचे व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने केल्यास नदी प्रदूषण रोखण्यास मोठा हातभार लागेल. त्यानंतर शहरातील गाड्यांचे सर्व्हिसिंग सेंटर, हॉटेल व मंगल कार्यालये, चिकन व मटण शॉप अशा प्रकारचा कचरा व सांडपाण्यासाठी खड्डे मारून स्वतंत्र व्यवस्था करता येणे शक्य आहे. त्यामुळे या घटकांची बैठक घेऊन त्यांना याबाबत मार्गदर्शन करावे. त्याचबरोबर मृतदेहांची राख देखील नदीत सोडण्याची प्रथा आहे. 'मुठभर श्रद्धेसाठी उरलेली शेतीसाठी' हा उपक्रम राबवून जागृती केल्यास पाणी प्रदूषण रोखण्यास मदत होईल. गडहिंग्लज उपविभागातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी 'पंचगंगा मॉडेल' राबविता येईल का याबाबत चर्चा व माहिती गोळा करून एक डेडलाइन ठरविण्यात यावी. या माहितीच्या आधारे प्रस्ताव तयार करून निधी, प्रशासकीय मान्यता घेता येईल. असे त्यांनी सांगितले. त्यासाठी २१ जुलैपर्यंत माहिती गोळा करण्याचे बैठकीत ठरले.
यावेळी प्रादेशिक अधिकारी श्री. साळुंखे यांनी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण तज्ञ, पर्यावरण प्रेमी, कार्यकर्ते व लोकसहभाग महत्त्वाचा आहे. केवळ शासकीय परिपत्रके काढून चालणार नाही तर ठोस कृती केल्यास नद्यांचे प्रदूषण रोखता येईल. जनजागृती करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे थांबविण्यासाठी प्रसंगी पर्यावरण कायद्यान्वये संबंधित घटकांना नोटीसा देखील देता येतील. शिवसेना पदाधिकारी व येथील पर्यावरण प्रेमींच्या सहभागाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत कौतुक केले. याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीस शिवसेनेचे गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, पर्यावरण प्रेमी अनिल मगर, यांच्यासह मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप घार्गे, आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे, गडहिंग्लज नगरपालिका पाणीपुरवठा अभियंता अनिल गंदमवाड, स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी.पी.कोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी बी. बी. शिणगारे, विस्तार अधिकारी राजन दड्डीकर, हिरण्यकेशी पाटबंधारे शाखाधिकारी श्रीकांत पाटील, आकाश यरटे यांच्यासह इतर अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.







