Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ठाकरे शिवसेना पक्षाचा गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा

चंदगड तालुक्यातील अवैध खनिज उत्खननावर कठोर कारवाईची मागणी 


शिवसैनिकांच्या घोषणांनी शहर दणाणले 


तातडीने कारवाई करण्याचे प्रांताधिकारी यांचे आश्वासन  



                                            छायाचित्र  : अशपाक किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड तालुक्यात सुरु असलेल्या अवैद्य खनिज उत्खननावर कारवाई करून कायमस्वरूपी बंद करण्यात यावे या मागणीसाठी गडहिंग्लज उपविभागीय कार्यालयावर शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ) विराट मोर्चा काढला. उत्खनन करून चंदगडचा निसर्ग उध्वस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आक्रमकपणे आपली भूमिका शिवसेनेने मांडली. जिल्हाप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, याबाबत प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले.



येथील लक्ष्मी चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी कोलिक, म्हाळुंगे येथील अवैध उत्खनन थांबवा, उत्खननाला पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, झोपलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार, संदेश पोहोचवा घरोघरी प्रत्येक दारी वृक्ष लावा एक तरी, डोंगर सपाटीकरण थांबवा, पर्यावरण वाचवा आदी घोषणांचे फलक शिवसैनिकांच्या हातात होते. शिवसैनिकांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले. हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यानंतर शिवसैनिक आक्रमकपणे उपविभागीय कार्यालयाच्या कमानीतून घोषणा देत कार्यालयाच्या आवारात गेले. यावेळी पोलिसांनी मोर्चा तिथेच अडवला. या ठिकाणी शिवसैनिकांनी घोषणा देत जमिनीवरच ठिय्या मारला.यावेळी  तालुकाप्रमुख दिलीप माने, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार यांची भाषणे झाली.





यावेळी प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  चंदगड तालुक्यातील शेतकरी वर्ग हा भात पीक व काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतो. येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने याच पिकांवर चालतो. मात्र सध्या या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या खनिज उत्खनन करण्यात येत आहे. याचा परिणाम येथील शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनावर होताना दिसत आहे. अवैध बॉक्साईड उत्खननामुळे शेतीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. त्यामुळे दरवर्षी शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी देखील मेटाकुटीला आले आहेत.तालुक्यातील कोलिक, म्हाळुंगे भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बॉक्साईड उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात धूळ काजूच्या झाडांवर बसत आहे. परिणामी काजू उत्पादनावर याचा परिणाम होत आहे. त्याचबरोबर सदर अवैद्य खनिज वाहतुकीसाठी वापरली जाणारी अवजड वाहने या भागातील रस्त्यांवरून धावत असल्याने रस्त्यांचे देखील नुकसान होत आहे. त्याचबरोबर ही खनिज वाहतूक रात्री बारानंतर केली जात असल्याने या मार्गावरील वाहतूक देखील धोक्याची बनली आहे. जीव मुठीत धरून नागरिकांना या मार्गावर प्रवास करावा लागतो. केवळ कारवाईचे नाटक केले जाते. शेतकऱ्यांसह नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अवैध खनिज उत्खनन करणाऱ्यांना अभय का दिले जात आहे? कुणाच्या आशीर्वादाने बिनबोभाटपणे हे उत्खनन सुरू आहे ? 



म्हाळुंगे, कोलिक परिसरात सुरू असलेले अवैद्य खनिज उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?  याची चौकशी होऊन कारवाई व्हावी, ज्या हद्दीत हे उत्खनन सुरू आहे त्या हद्दीतील ग्रामपंचायत यंत्रणा कारवाई का करत नाही?, खनिज उत्खननाच्या धुळीमुळे काजू उत्पादनाचे नुकसान थांबवावे व यापूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई उत्कलनवाल्यांकडून वसूल करण्यात यावी, खनिज उत्खननासाठी केली जाणारी अवजड वाहतूक तातडीने बंद करून रस्ता निर्धोक करण्यात यावा. खनिजाचे उत्खनन करून चोरट्या मार्गाने वाहतूक करत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्यांवर कारवाई करावी, अवैध खनिज उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले असताना देखील, त्यावर कायमस्वरूपी कारवाई का केली जात नाही? याची पाळेमुळे शोधून काढण्यात यावे, खनिज उत्खननामुळे निसर्गाची होत असलेली अपरिमित हानी थांबवावी आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. 




या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, जिल्हा महिला संघटिका शांता जाधव, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, कागल तालुका प्रमुख जयसिंग टिकले, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, जिल्हा युवा सेना अधिकारी अवधूत पाटील, गडहिंग्लज तालुका संघटिका ॲड. स्नेहल पाटील, शहर प्रमुख स्वरूपा पेंडुरकर, श्रद्धा शिंत्रे, उपतालुकाप्रमुख सुधाकर जगताप, विभाग प्रमुख दिगंबर पाटील, उपशहर प्रमुख संदीप चव्हाण, प्रकाश जाधव, काशिनाथ गडकरी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.