ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांचे आवाहन
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजला तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुखांची बैठक
गडहिंग्लज(प्रतिनिधी): 'गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक' ही मोहीम राबविण्याकडे शिवसैनिकांनी अधिक लक्ष द्यावे. या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील तालुकाप्रमुख व उपतालुकाप्रमुखांची बैठक गडहिंग्लज येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, सुरेशराव चौगुले, संभाजी भोकरे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख प्रा. शिंत्रे पुढे म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांचे चांगले योगदान तर आहेच, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्याबद्दल जनतेत असलेली सहानुभूतीयामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती प्रचंड मताधिक्याने विजय झाले. मतदारांनी ही सहानुभूती मत यंत्रातून दाखवून दिली. नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना मतदारानी या माध्यमातून चपराक दिली. लोकसभेतील यश पाहता विधानसभेला देखील शिवसैनिकांनी अशाच जोमाने काम करण्याची गरज आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी शिवसैनिकांनी गावा गावात आपली पक्ष संघटना मजबूत करावी. गाव तेथे शाखा घर तिथे शिवसैनिक या मोहिमेद्वारे सेनेची ताकद वाढवावी. आगामी तीन महिने शिवसैनिकांनी पायाला भिंगरी बांधून पक्षासाठी झटावे. असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यानी जनतेचे प्रश्न उचलून धरत शासन पातळीवर पाठपुरावा करावा असे आवाहन देखील केले. यावेळी जिल्हा ग्रामीणमधील प्रत्येक तालुक्यातील पक्षाच्या परिस्थितीबद्दल आढावा घेण्यात आला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगुले यांनी मातोश्री वरून आलेले आदेशाचे तंतोतंत पालन करून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. गडहिंग्लज तालुकाप्रमुख अजित खोत यांनी तालुक्यातील पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असण्याची सांगितले. या बैठकीस तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, युवराज पोवार, अविनाश शिंदे, जयसिंग टिकले, कृष्णा डकरे, शिवगोंड पाटील, उत्तम पाटील, तालुका संघटक मारुती पुरीबुवा, विक्रम मुतकेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील यांच्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील उपतालुकाप्रमुख उपस्थित होते. आभार तालुकाप्रमुख अजित खोत यांनी मानले.

