Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'हिरण्यकेशी'चे पाणी प्रदूषित करणाऱ्या संकेश्वर कारखाना व नगरपालिकेवर कारवाई करा!

अन्यथा 20 जून रोजी गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करणार


हिरण्यकेशी व नांगनूर पंचक्रोशी पाणी हक्क संघर्ष समितीचे प्रांत अधिकारी यांना निवेदन 


 



गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर येथील साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणी व संकेश्वर नगरपालिकेचे ड्रेनेजचे सांडपाणी हिरण्यकेशी नदीत मिसळत असल्याने नागनूर पंचक्रोशीतील नांगनूरसह खणदाळ, अरळगुंडी, कडलगे, इदरगुच्ची या पाच गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्नी संकेश्वर साखर कारखाना, संकेश्वर नगरपालिकेवर कारवाई करण्यात यावी व तातडीने या समस्येवर उपायोजना करण्यात यावीअन्यथा दिनांक २० जून रोजी गडहिंग्लज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा हिरण्यकेशी व नांगनूर पंचक्रोशी पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भातील निवेदन माजी सभापती अमरसिंह चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांना देण्यात आले.



या निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर येथील साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी आणि संकेश्वर नगरपालिकेचे सांडपाणी  व ड्रेनेजचे पाणी २००९ पासून हिरण्यकेशी नदीत सोडले जात आहे. यामुळे नदीचे पाणी वारंवार दूषित होत असून यामुळे मानवी आरोग्याबरोबरच पशुपक्षी यांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. त्याचबरोबर शेत जमिनीचेही नुकसान होत आहे. याबाबत गेली अनेक वर्षे नांगनूर, अरळगुंडी, कडलगे, खणदाळ, इदरगुच्ची या गावातील नागरीक वेळोवेळी संकेश्वर साखर कारखाना व नगरपालिका यांना पत्रव्यवहार करत आहेत. परंतु या दोन्ही संस्थेकडून प्रतिसाद मिळालेला नाही. या विरोधात नांगनूर येथील शाहू मोकाशी यांनी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार देखील नोंद केली होती. 



याबाबत सुनावणी होऊन २०२२ साली आयोगाने कारवाईचे थेट निर्देश दिले होते. आदेशाच्या तारखेपासून दोन महिन्यात कारवाई झाली पाहिजे असे स्पष्ट निर्देश असताना देखील कर्नाटक पोल्युशन बोर्डाने काहीही कारवाई केलेली नाही. संकेश्वर साखर कारखान्याला या प्रश्नावरून दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान, २६ जानेवारी २०२४ रोजी प्रदूषण  नियंत्रण मंडळाने  प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पाण्याचे नमुने तपासून हे पाणी रसायनमिश्रित असल्याचे सांगितले आहे. संकेश्वर कारखाना व नगरपालिकेमुळे पाच गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मळीमिश्रित या पाण्यामुळे इथल्या पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजातींसह जलचर प्राणी देखील नष्ट झाले आहेत. त्यामुळे संकेश्वर साखर कारखाना व नगरपालिकेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून केले आहे. अन्यथा २० जून रोजी या पाचही गावातील ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.




निवेदनावर अमरसिंह चव्हाण, अमृत शिंत्रे, बाळगोंडा पाटील, शाहू मोकाशी, वसंत नाईक, सुरेंद्र देशपांडे, सुजित देसाई, शिवानंद मोरबाळे, राजेंद्र करीगार, सिद्राम आमाते, शिवाजीराव माने, राजू बंदाई, लक्ष्मण नवलगुंदे, मयोदीन मुल्ला, युवराज राऊत, शंकर केसरोळी, रशीद मुल्ला, विजय जाधव, सचिन नाईक आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.