शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीग
अवधुत चव्हाणचे दोन गोल; इफाचा निसटता पराभव

गडहिंग्लज : डेव्हलपमेंन्ट लीगचे फुटबॉलला किक मारून दिग्विजय कुराडे यांनी उदघाटन केले. यावेळी डॉ सुरेश संकेश्र्वरी, मल्लिकार्जून बेल्लद, गुडूं पाटील, नंदू पाटील, अलिखान पठाण आदी. (छाया: सोहेल बस्तवडे)
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवराज युनायटेड डेव्हलपमेंन्ट फुटबॉल लीगच्या पहिल्या दिवशी श्रेयस- अर्थव वॉरियर्स आणि गुफा गार्डीयन्स संघाने प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली. इफा लायन्सला टायब्रेकरमध्ये निसटता पराभव स्वीकारावा लागला. श्रेयस अर्थवच्या अवधुत चव्हाणने दोन गोल करून दिवस गाजविला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विदया संकुलातर्फे एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरु आहे.
शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उदघाटन केले. जेष्ट माजी खेळाडू डॉ सुरेश संकेश्र्वरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. समन्वयक रोहित साळुंखे यांनी स्वागत केले. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद, प्राचार्य कदम, गुडूं पाटील, नंदू पाटील, अलिखान पठाण, अरूण पाटील, प्रा.जयवंत पाटील, विक्रम शिंदे, अर्थव मिसाळ, सुरेश कोळकी, भैरू सलवादे उपस्थित होते. अनिकेत कोले यांनी आभार मानले. ललित शिंदे यांनी सुत्रसंचलन केले.
पहिल्या सामन्यात गुफा गार्डीयन्सने इफा लायन्सला टायब्रेकरमध्ये ४-३ असे नमविले. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. पुर्वार्धात वर्धन कांबळेने तर उत्तरार्धात सौरभ मोहितेने बरोबरीचा गोल केला. टायब्रेकरमध्ये गुफाच्या विदयाधर धबाले, शुभम कागिनकर, प्रविण पोवार, सश्रृत सासनेने तर इफाच्या सौरभ मोहिते, सिध्दार्थ दड्डीकर, महेश पोवारने गोल मारले. दुसऱ्या सामन्यात श्रेयस अर्थव वॉरियर्सने संघर्ष फायटर्सचा ४-० असा पराभव केला. वॉरियर्सच्या आलोक पाटीलने सुरज हनिमनाळेच्या क्रॉसपासवर १२ व्या मिनिटाला हेडव्दारे गोल करून संघाचे खाते उघडले. मांतेश चौगडीने मैदानी गोल करून मध्यतरापर्यंत २-० अशी आघाडी केली. उत्तरार्धात अवधूत चव्हाणने २२ आणि २६ व्या मिनिटाला उत्कष्ट गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

