शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरसिंह चव्हाण यांनी घेतली आगार प्रमुखांची भेट
१० जुलैपर्यंत कार्यवाही करण्याची सूचना, अन्यथा आंदोलनाचा इशारा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): उन्हाळी सुट्टीनंतर आता सर्वच शाळा महाविद्यालय सुरू झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून गडहिंग्लजला शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता प्रत्येक गाव खेड्यातून गडहिंग्लजकडे येणाऱ्या बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेत पोचता येणे शक्य होईल. येत्या १० जुलै पर्यंत याबाबतची कार्यवाही करण्यात यावी अन्यथा विद्यार्थी व पालकांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरसिंह चव्हाण यांनी गडहिंग्लज आगाराला दिला आहे. याबाबत श्री. चव्हाण यांनी आगरप्रमुख गुरुनाथ रणे यांची भेट घेऊन चर्चा केली.
आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने पहाटेच्या वेळी व सकाळी दहा ते अकराच्या सुमारास तालुक्याच्या विविध भागातून शिक्षणासाठी गडहिंग्लजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिवहन विभागाकडून कोणत्याही प्रकारची शाश्वत व्यवस्था होत नसल्याचे दिसून आले आहे. पहाटे व सकाळच्या सत्रात गडहिंग्लजकडे येणाऱ्या बसफेऱ्यांची संख्या वाढवून सर्वच विद्यार्थ्यांना वेळेत शाळा महाविद्यालयांमध्ये पोहोचता यावे याबाबत नियोजन करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. सदरची कार्यवाही ही १० जुलैपर्यंत करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी उपस्थित चंदगड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अमरसिंह चव्हाण, हसुरसासगिरीचे सरपंच प्रदीप कडुकर, दत्तात्रय नाईक, बाळासाहेब हुल्लोळी, बाळासाहेब महाडिक, रणजीत वाळवे, विश्वास मुगळे यांच्यासह पालक उपस्थित होते.

.jpg)