Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजच्या दसरा चौकातील बेकायदा होर्डिंगसचे सांगाडे हटवा, अन्यथा मनसे स्टाईलने उखडून टाकू!

मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेला निवेदन 


दोन दिवसांचा दिला अल्टिमेटम 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील दसरा चौक परिसरातील  बेकायदा होर्डिंगस वरील फलक उतरवले आहेत मात्र सांगाडे तसेच ठेवण्यात आले आहेत. हे सांगाडे तातडीने हटवावेत अन्यथा मनसे स्टाईलने उखडून टाकण्याचा इशारा मनसेने नगरपालिकेला दिला आहे. जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना याबाबतचे निवेदन देत याकडे लक्ष देण्यात आले.




या निवेदनात म्हटले आहे की, होर्डिंग कोसळून 17 जण मृत्युमुखी पडल्याची आणि शेकडो लोक जखमी झाल्याची घटना नुकतीच मुंबई येथे घडली आहे. त्यानंतर सर्वत्र बेकायदा होर्डिंग हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गडहिंग्लज नगरपालिकेने सुद्धा शहरातील सर्व होर्डिंगचा सर्वे केला असून अनेक बेकायदा होर्डिंगबाबत संबंधितांना ते हटवण्याच्या सूचना दिल्याचे कळते. त्यानुसार शहरातील दसरा चौकातील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या आवारातील होर्डींग्ज वरील फलक उतरवण्यात आले, मात्र त्याचे सांगाडे अद्यापही त्याच स्थितीत उभे आहेत. कदाचित हा मामला थंड होण्याची, त्यावरील निर्बंध शिथिल होण्याची अथवा परवानगी मिळण्याची संबंधित होर्डिंगधारक वाट पाहत असावेत. मात्र दसरा चौक हा नेहमी गजबजलेला चौक असून ते होर्डिंग बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या आवारात आहेत. विद्यालयात लहान मुले असतात व विविध कार्यक्रम देखील होत असतात. त्याशिवाय त्याच्याखालीच नगरपालिकेच्या मालकीचे व्यावसायिक दुकान गाळे देखील आहेत. अशा स्थितीत एखादे होर्डिंग कोसळले तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे तेथील कुठल्याही होर्डिंगला परवानगी देण्यात येऊ नये, शिवाय आता असलेले होर्डिंगचे सांगाडे तात्काळ काढून टाकण्यात यावेत. यासाठी संबंधितांना दोन दिवसाची मुदत आम्ही देत आहोत. होर्डिंगचे सांगाडे तेथून काढले नाहीत तर मनसे स्टाईलने ते होर्डिंग तेथून उखडून टाकू असा इशारा या निवेदनातून दिला आहे.




निवेदनावर  जिल्हाध्यक्ष  नागेश चौगुले, मनविसे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, शहर उपाध्यक्ष अभिजित देसाई, संदिप कुरबेट्टी, केंपांना कोरी  आदींच्या सह्या आहेत.


 बातमीचा व्हिडिओ येथे पहा 👇





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.