कोल्हापूर : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. कोल्हापुरात आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने हजारो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संजयबाबा घाटगे, के.पी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू बाबा आवळे सहभागी झाले होते.
महाराष्ट्र सरकारने गोवा ते नागपूर असा ८०६ किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग करणार असल्याचे जाहीर केले आहे. याकरिता ४० हजार एकर जमीन संपादित केली जाणार असून ८६ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या महामार्गास बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. राज्यातील कोणत्याही नागरिकांनी समूहाने किंवा संघटनेने या महामार्गाची मागणी केलेली नव्हती. तरीदेखील शेतकऱ्यांशी चर्चा न करताच हा प्रकल्प रेटला गेला आहे.
या महामार्गामध्ये संपादित होणारी जमीन ही बहुतांश बागायत आहे. पर्यावरण, जैवविविधता, जलस्रोत, भूजल पातळी, नदी, विहिरी, कालवे पाण्याच्या पाईपलाईन, शेती या सर्व गोष्टी या महामार्गामुळे नष्ट होणार आहेत. पर्यायी महामार्ग असताना हा महामार्ग केवळ कंत्राटदार, रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व मंत्री यांच्या संगनमताने लाभाच्या उद्देशाने तयार होत आहे. महाराष्ट्रात अगोदरच शेतीतील संकटामुळे दिवसाला तीन याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करत आहेत याबद्दल उपाययोजना करणे गरजेचे असताना सरकार शेतकऱ्यांकडून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच हिरावून घेत आहे. आम्ही एक इंच देखील जमीन या मार्गासाठी देणार नाही. शासनाने हा महामार्ग 12 जुलैपर्यंत रद्द करावा. अन्यथा त्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या महामोर्चास शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, डॉ. भारत पाटणकर, कॉ. अतुल दिघे, भगवान काटे, एम. पी. पाटील, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, अमरीश घाटगे, राहुल आवाडे, रामराजे कुपेकर, गिरीश फोंडे, विक्रांत पाटील, सम्राट मोरे, शिवाजी कांबळे, बाबासो देवकर, धनराज घाटगे, महादेव धनवडे, प्रसाद खोबरे, सुधाकर पाटील, सर्जेराव देसाई, प्रकाश पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित होते.





