Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

1 ऑगस्ट पासून राज्यात महसूल पंधरवड्याचे आयोजन

8 ऑगस्ट रोजी महसूल जनसंवाद उपक्रमांतर्गत महसूल विभागातील विविध प्रकरणे, अपील, सलोखा योजनेतील प्रकरणे, जमिनीविषयक खटले निकाली काढणार 


10 ऑगस्ट रोजी "सैनिक हो तुमच्यासाठी" उपक्रमातून सैनिकांच्या बाबतीतील सर्व जमिनीची प्रकरणे, आणि दाखले वाटप होणार 


        



मुंबई: महसूल विभागाकडून दरवर्षी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात या वर्षी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदल करून महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता 1 ते 15 ऑगस्ट पर्यंत महसूल पंधरवडा साजरा केला जाणार आहे.


            


या 15 दिवसांत महसूल विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवून महसूल विभागाच्या विविध योजना आणि सेवा सुविधांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि लोकांमध्ये महसूल विभागाबद्दल अधिक विश्वास निर्माण व्हावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे मंत्री श्री.विखे पाटील यांनी व्यक्त सांगितले.


            


महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची नागरिकांना अधिक माहिती मिळावी आणि त्यांची कामे जलद आणि सुलभ व्हावीत यासाठी महसूल पंधरवड्यात 1 ते 15 ऑगस्ट  या कालावधीत  विविध उपक्रम राबविले जाणार असून नागरिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करून महसूल सप्ताहाचा शुभारंभ केला जाईल. या दिवशी ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्जदारांना लागणारी सर्व कागदपत्रे दिली जातील. 2 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, 3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना , 4 ऑगस्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, 5 ऑगस्ट रोजी कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, 6 ऑगस्ट रोजी शेती, पाऊस आणि दाखले उपक्रम राबविला जाणार आहे.


             


या उपक्रमात पूर्व मॉन्सून व मॉन्सून कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे, शेती, फळबागा, जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत आढावा घेऊन विविध दाखले वाटप केले जाईल, 7 ऑगस्ट रोजी युवा संवाद उपक्रमाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण आणि रोजगाराच्या अनुषंगाने विविध दाखल्यांचे वाटप केले जाणार आहे. 8 ऑगस्ट रोजी महसूल जनसंवाद उपक्रमाच्या अंतर्गत महसूल विभागातील विविध प्रकरणे, अपील, सलोखा योजनेतील प्रकरणे, जमिनीविषयक खटले निकाली काढली जातील. 9 ऑगस्ट रोजी महसूल ई प्रणाली उपक्रमातून ऑनलाईन प्रणालीच्या बाबतीत जनजागृती करून ‘आपले सरकार’ या सरकारी संकेतस्थळावरील प्राप्त तक्रारींची दखल घेऊन निकाली काढल्या जातील. 10 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी उपक्रमातून सैनिकांच्या बाबतीतील सर्व जमिनीची प्रकरणे, आणि दाखले वाटप केले जातील. 11 ऑगस्ट रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन करून जनजागृती केली जाईल.


            


12 ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा- दिव्यांगाच्या कल्याणाचा’ राज्याच्या वतीने दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रमाची माहिती देण्यात येणार आहे.तसेच महसूल विभागाशी संबंधित सर्व प्रकारचे दाखले वाटप केले जातील. 13 ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संवाद आणि प्रशिक्षण शिबिर राबविले जाऊन महसूल कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि तक्रारी सोडविल्या जातील. 14 ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करून महसूल पंधरवड्यातील माहिती माध्यमांना दिली जाईल, तर 15 ऑगस्ट रोजी संवर्गातील कार्यरत, निवृत्त अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संवाद आणि उत्कृष्ट कामे केलेल्या कर्मचारी पुरस्कार वितरण आणि महसूल पंधरवड्याचा सांगता समारंभ साजरा केला जाईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.