विनायक उर्फ अप्पी पाटील यांची ग्वाही
महागाव येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटप नोंदणी शुभारंभ
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आपल्या जीवाची पर्वा न करता मोठ्या जोखमीची कामे बांधकाम कामगार करत असतात. त्यामुळे देशाच्या प्रगतीत या कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. बांधकाम कामगारांना शासन स्तरावरील विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी दिली.
महागाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये बांधकाम कामगारांना संसार उपयोगी ऑनलाईन साहित्य वाटप नोंदणी शुभारंभ व ग्रामपंचायतीच्या वतीने रोपे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कामगार संघटेनेचे राजू खमलेट्टी, सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच संदिप कोकितकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. पाटील पुढे म्हणाले, कामगारांची समर्थ साथ व पाठिंब्यामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मला यशस्वीरित्या काम करता आले. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता बांधकाम कामगार रात्रंदिवस काम करत असतात. त्यामुळे प्रसंगी त्यांना आपल्या कुटुंबाकडे देखील लक्ष देता येत नाही. कामगारांच्या या व्यथा मी अगदी जवळून पहिल्या आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांचे जीवन सुखकर होण्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी असेन असे आश्वासन त्यांनी कामगारांना दिले.
प्रास्ताविक अर्जुन दिवटे यांनी केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार,पांडुरंग चौगुले,जयदीप सरनोबत, ग्रामपंचायत सदस्य सुरज आसवले, विकास इंगोले, परशराम हुले,चंद्रशेखर पाटील, सुनिल शेलार, रोहित माळी,पांडुरंग गोंधळी,काशिनाथ कोरे,सचिन शिंदे यांच्यासह बाधकाम क कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन हृदयनाथ सोमशेट्टी तर आभार फिरोज सोलापुरे यांनी मानले.





