Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'उमेद' कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा !

आमदार राजेश पाटील यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे विनंती 


आझाद मैदानात आंदोलकांची भेट घेत केली विचारपूस 


विधानसभेत चर्चा घडवत उमेद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे वेधले लक्ष 





मुंबई : मुंबई येथील आझाद मैदानात सुरू असलेल्या उमेद कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी भेट देत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांना उमेद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार होऊन  सकारात्मक तोडगा काढण्याची विनंती केल्याचे आमदार श्री. पाटील यांनी सांगितले.



आझाद मैदानातील आंदोलनस्थळी बोलताना आमदार राजेश पाटील म्हणाले,  विधान परिषद निवडणुकीमुळे मी तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादीचे सर्व आमदार बाहेर असल्यामुळे गेले दोन दिवसापासून सुरू असलेल्या उमेद कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देणे शक्य झाले नाही. उमेद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मला प्राप्त झालेले निवेदन व माझे पत्र जोडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना उमेद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी विनंती केली आहे. विधानसभेत देखील माझ्यासह आमच्या सहकारी आमदारांनी या प्रश्नावर चर्चा घडवून आणली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारने  कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यात यावा व उमेद कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी विनंती केलेली आहे. आंदोलनातील  भगिनीनीं आपले आरोग्य सांभाळून आंदोलन करावे, कोणत्याही प्रकारची टोकाची भूमिका न घेता शांततेने आंदोलन करून आपल्या मागण्यांवर तोडगा काढून घ्यावा. असे आवाहनही त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.




पावसामुळे आझाद मैदानात चिखल झाले आहे, तरीदेखील उमेद महिला कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी ठाण मांडत आपले आंदोलन सुरू ठेवले आहे, या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाटील यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.



महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत काम करत असलेल्या कंत्राटी महिला व कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत कायम करावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, बुधवारी या कर्मचाऱ्यांनी मंत्रालयावर विराट मोर्चा काढत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले होते. बुधवारी झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. उमेदला शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्यावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, केडरप्रमाणे मानधन वाढ करावी, वर्धिनींना पूर्णवेळ काम द्यावे, मिटिंगचा प्रवास व उपस्थिती भत्ता मिळावा आदी मागण्या या कर्मचाऱ्यांच्या आहेत. आंदोलनात  राज्यातील महिला बचत गटातील सुमारे ५ लाख महिला सहभागी झाल्या आहेत.



 

व्हिडिओ येथे पहा 👇




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.