आमदार राजेश पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात मांडला प्रश्न
एसटी महामंडळाला सूचना करण्याची केली मागणी
मुंबई : गडहिंग्लज, चंदगड, आजरा बसस्थानकांना एसटी महामंडळाने जादा बसेस द्याव्यात. या संदर्भात महामंडळाला सूचना देण्यात यावी असे चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यांनी विधानसभेत सांगत या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी एसटी बसने प्रवास करत असतात. मात्र या तीनही आगारातील अपुऱ्या बस संख्येमुळे विद्यार्थ्यांना गैरसोईला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या तीनही आगारांना एसटी महामंडळाकडून जादा बसेस उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना करण्यात याव्यात असे सांगून आमदार राजेश पाटील यांनी या समस्येकडे लक्ष वेधत मागणी उचलून धरली. गेले कित्येक वर्ष या आगारांमधील अपुऱ्या बससंख्येचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येतो. प्रवासी संख्या व गाड्यांची संख्या पाहता या तीनही आगारांना विविध मार्गावर गाड्या सोडताना मोठी कसरत करावी लागते. ही समस्या लक्षात घेऊन आमदार राजेश पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत असून या संदर्भात तातडीने कार्यवाही झाल्यास विद्यार्थ्यांसह जनतेला दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
त्याचबरोबर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी विद्यापीठ असे नामांतरण करण्यात यावे. जेणेकरून छत्रपती शिवरायांचा उल्लेख एकेरी होणार नाही याकडे देखील आमदार राजेश पाटील यांनी लक्ष वेधले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांना तातडीने सदनिका देऊन त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.
व्हिडिओ येथे पहा 👇

