गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर शिवसेनेचे अनोखे आंदोलन
आठ दिवसात पथदिवे सुरू न झाल्यास 'रास्ता रोको' चा इशारा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील मुख्य मार्गावरील पथदिवे व हायमास्ट गेले दोन महिने बंद आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी बंद असलेल्या या पथदिव्यांखाली मेणबत्ती लावत प्रांत कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. दरम्यान, याबाबतचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज शहरातून संकेश्वर -बांदा हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या रस्त्याच्या कडेला असणारे पथदिवे गेली दोन महिने बंदच आहेत. महामार्गाचे काम पूर्ण होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप हे दिवे प्रकाशमान झालेले नाहीत. याचा फटका शहरातील वाहतुकीवर व व्यापारावर होत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने अंधारामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. हिटणी नाक्यापासून हिरलगे नाक्यापर्यंत तसेच गडहिंग्लज शहरामध्ये येणाऱ्या हद्दीतील पथदिवे सुरू करण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने घ्यावी व येत्या आठ दिवसात पथदिवे व हायमास्ट सुरू करावेत, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून शिवसेनेने दिला आहे.
यावेळी तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, शहर प्रमुख संतोष चिकोडे, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, सुधाकर जगताप, प्रकाश रावळ, जिल्हा युवा अधिकारी अवधूत पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख सागर हेब्बाळे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख संदीप चव्हाण, संदीप कुराडे, श्रीशैल साखरे, सुनील डवरी, तेजस घेवडे, मनीष हावळ, संभाजी येडुरकर, रोहित माने, केदार डांग यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.



