गडहिंग्लजला ठाकरे पक्ष शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मतदान ओळखपत्र व मतदार याद्यांमध्ये झालेल्या विविध चुकांची दुरुस्ती वेळेत होत नसल्याने मतदारांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या दुरुस्त्या वेळेत करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या निवडणूक आयोगामार्फत मतदार नोंदणी विशेष संक्षिप्त मोहीम सुरु आहे. मात्र ओळखपत्रावरील, मतदार यादीमधील पत्ता, नाव वगळणे, नावात, मधल्या नावात, आडनांव, वय वर्षे चुकीचे झालेली असतात ते दुरुस्त होवून मिळावे यासाठी अनेकदा विविध नमुन्याचे फार्म भरून देऊन देखील दुरुस्ती झालेली दिसत नाही. फक्त वय १८, १९ व २० वर्षाचे नवीन मतदार ६ नंबरचे भरलेले फॉर्म सादर केले जातात. यामध्ये दुरुस्तीसाठी दिलेल्या अर्जांची कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसत नाही. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक गावांत मतदारांच्याकडे मतदान ओळखपत्र असून देखील मतदार यादीमध्ये नाव नसल्याने मतदान करण्यापासून त्यांना वंचित राहावे लागले आहे. मतदान ओळखपत्रेही मतदारांना पोस्टाने मिळालेली नाहीत.
या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन येत्या विधानसभा निवडणूक दरम्यान बिनचुक मतदार यादी तयार करण्यात यावी जेणेकरून मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहु नये, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
निवेदनावर तालुकाप्रमुख दिलीपराव माने, अजित खोत, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, सुधाकर जगताप, शहर प्रमुख संतोष चिकोडे, उपशहर प्रमुख संदीप चव्हाण, , श्रीशैलाप्पा साखरे, प्रकाश रावळ, शाखाप्रमुख सुशील बोजगर, केदार डांग, युवा सेना समन्वयक तेजस घेवडे, तालुकाप्रमुख सागर हेब्बाळे, अक्षय माने, संभाजी येडूरकर, रफिक मुल्ला, महादेव पाटील आदींच्या सह्या आहेत.

