आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची मागणी
मुंबई : विधान परिषदेमध्ये आज वीज कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी त्यांचे प्रश्न मांडले.
42000 कंत्राटी कर्मचारी 9 जुलै रोजी आंदोलनाच्या तयारीत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात यापूर्वी माननीय ऊर्जा मंत्री व ऊर्जा सचिव यांच्या सोबत बैठकीमध्ये सकारात्मक भूमिका घेऊनही त्यावेळी झालेल्या चर्चेस पुढे मूर्त रूप मिळाले नाही, हि बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली. महावितरण आणि महापारेषणच्या वेतनामधील फरक दूर करता येईल का? अतिरिक्त गुण वाढविण्यात येतील का? कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरसकट "हरियाणा पॅटर्न" लागू करणे सोयीस्कर होऊ शकेल का? असे प्रश्न उपस्थित केले. ऊर्जा सचिवांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मार्ग निघाला नसल्यामुळे ऊर्जामंत्र्यांनी हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा अशी मागणी केली.
यावर, सध्या "हरियाणा पॅटर्न" मधील सर्व मुद्दे आपण घेतले असून वाढीव मार्कासंदर्भात पडताळणी करून पाहता येईल. तसेच सर्व युनियन सोबत आजच ऊर्जा सचिवांची बैठक होत असून या बैठकीत तोडगा काढण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे, असे उत्तर ऊर्जामंत्र्यांनी दिले.

