सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्परतेमुळे जनतेत समाधान
'गडहिंग्लज बुलेटिन न्यूज'च्या वृत्ताची घेतली दखल
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथील हिरण्यकेशी नदीवर असणाऱ्या पुलावरील रस्त्याची आज सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वच्छता केल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. याबाबत काल 'गडहिंग्लज बुलेटिन न्यूज' ने बातमी प्रसारित करत या समस्येकडे लक्ष वेधले होते. याची दखल तातडीने घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परता दाखवल्याने कौतुक होत आहे.
हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर स्वच्छतेअभावी दोन्ही बाजूला गवत वाढले होते. माती व पाणी तुंबून राहिल्याने रात्री वाहन चालकांना वाहतूक करणे धोक्याचे बनले होते. त्यामुळे पुलावरील रस्त्याची स्वच्छता करून रस्ता वाहतुकीस निर्धोक करावा अशी मागणी ठाकरे शिवसेना पक्षाचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी 'गडहिंग्लज बुलेटिन न्यूज'च्या माध्यमातून केली होती. या समस्येची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घेत पुलावरील रस्त्याची स्वच्छता केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेले गवत काढण्यात आले. तुंबत असलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला.



