Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव पुलावर सलग चौथ्या दिवशी पुराचे पाणी कायम ; अद्याप वाहतूक बंदच

भडगावच्या दिशेने चारशे मीटर अंतरापर्यंत पुराचे पाणी 



                                  छायाचित्र : वसंत नाईक, भडगाव 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने  वाढ होत असल्यामुळे पुराची तीव्रता वाढत आहे. गडहिंग्लज- चंदगड मार्गावरील भडगाव पूल सलग चौथ्या दिवशी देखील पाण्याखालीच आहे. पुराचे पाणी आता भडगावाच्या दिशेने जवळपास  चारशे  मीटर अंतरापर्यंत आले आहे. भडगाव नजिकच्या ए. बी. भोसले मोबाईल दुकाना जवळ पाणी आले असून या भागातील दुकानांमधील साहित्य काल रात्रीपासून सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.





गडहिंग्लजमधील नदीवेस परिसरात देखील पुराचे पाणी वाढल्याने येथील नागरिकांना धास्ती आहे. तालुक्यातील सर्व बंधारे देखील पाण्याखाली गेल्याने गेल्या चार दिवसापासून संपूर्ण वाहतूकच ठप्प झाली आहे. एकमेव पर्याय असणारा गजरगाव बंधारा देखील पाण्याखाली गेल्याने हा मार्ग देखील बंद झाला आहे. त्यामुळे गडहिंग्लजचा संपर्कच तुटला असून जनजीवन विस्कळीत बनले आहे.





पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन टीम देखील सतर्क असून सज्जता ठेवण्यात आली आहे. गडहिंग्लज तालुक्याला सर्व बाजूने पुराचा वेढा पडल्याने वाहतूकच थांबली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज व उद्या  दोन दिवस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुट्टी जाहीर केली आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन नागरिकांना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


                  व्हिडिओ येथे पहा  👇👇


 

भडगाव आपत्ती व्यवस्थापनची टीम सज्ज 


भडगाव येथील नदीजवळ मुख्य मार्गावर असणाऱ्या दुकानांच्या दिशेने पुराचे पाणी येत असल्याने पोलीस पाटील उदय पुजारी, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, ग्रामसेवक राजेंद्र गवळी, तलाठी सौ. रुपाली कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी खबरदारी घेत या दुकानांमधील सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मदत करत आहेत.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.