Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीकरांची प्रतीक्षा संपली ; धरण 'ओव्हरफ्लो'

सांडव्यातून पाणी वाहू लागले, ग्रामस्थांतून समाधान 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील तेरणी लघु पाटबंधारे प्रकल्प काल (दि. 25) पूर्ण क्षमतेने भरला. या प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तेरणीकरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे.



गावच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाने १९ जून १९८९ रोजी या ठिकाणी लघु पाटबंधारे प्रकल्पाला मान्यता दिली. १९९२ साली सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर १९९५ साली ५० लाख रुपये खर्च करून हे धरण बांधण्यात आले आहे. या धरणासाठी तत्कालीन आमदार, माजी सहकार मंत्री, माजी विधानसभा अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचे योगदान महत्वाचे होते. त्यांच्या कारकीर्दीतच हा प्रकल्प पूर्णत्वास गेला होता. या धरणाची ढोबळ पाणीसाठा क्षमता १२२. ७५ दशलक्ष घनफूट इतकी आहे. या धरणावर तेरणीसह हलकर्णी, कवळीकट्टी, बुगडीकट्टी, चंदनकुड या पाच गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना याच अवलंबून आहेत. पाच गावांचे तहान भागवणारे हे धरण आहे. 



गेली दोन वर्ष गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील हलकर्णी परिसरात पाऊसमान कमीच होता. त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नव्हते. संपूर्ण तालुक्यात मोठा पाऊस झाला तरी हलकर्णी, तेरणी परिसरात मात्र पावसाचे प्रमाणच कमी होते. त्यामुळे येथील शेती पाण्याचा प्रश्न वारंवार चर्चेत येत होता. यंदा तब्बल दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गेले आठवडाभर संततधार व दमदार पाऊस सुरू आहे. या पावसाने सुखावलेल्या तेरणीकरांना धरण भरण्याची प्रतीक्षा व उत्सुकता होती. अखेर गुरुवारी धरण 'ओव्हरफ्लो'  झाले आणि तेरणीकरांची प्रतीक्षा संपली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.