हत्ती- कोले-षण्मुगम शालेय फुटबॉल स्पर्धा
एमआर, सर्वोदयाचा चमकदार विजय
![]() |
| गडहिंग्लज : येथील हत्ती-कोले-षण्मुगम शालेय फुटबॉल स्पर्धेचे फुटबॉलला किक मारून शिक्षण विस्तार अधिकारी आर. आर. कोरवी यांनी उदघाटन केले. (छाया :शुभम आजगेकर) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे रुद्राप्पा हत्ती, आप्पासाहेब कोले, षण्मुगम शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सतरा वर्षे गटात जागृती हायस्कुल आणि न्यू होरायझन स्कुलने आपपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. चौदा गटात महाराणी राधाबाई हायस्कुल (एमआर), सर्वोदया स्कुलने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. येथील एमआर हायस्कुलच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकुण १६ संघानी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे यंदाचे तेरावे वर्ष आहे.
शिक्षण विस्तार अधिकारी आर. आर. कोरवी यांच्या हस्ते फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी विनायक काळगे, अभिजित चव्हाण उपस्थित होते. स्पर्धा प्रमुख प्रथमेश धबाले यांनी स्वागत केले. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर प्रास्ताविकात हत्ती-कोले- षण्मुगम यांच्या योगदानाची माहिती दिली. सौरभ मोहिते यांनी आभार मानले.सतरा वर्षे गटाच्या चुरशीच्या सामन्यात जागृती हायस्कुलने क्रिएटिव्ह स्कुलला २-१ असे नमविले. क्रिएटिव्हच्या विश्वजीत बिलावरने तिसऱ्या मिनिटाला घेतलेली गोलची आघाडी जागृतीच्या रोहित जगताप, वैभव सुतारने जिगरबाज गोल करून विजय साकारला. साधना हायस्कुलने गडहिंग्लज हायस्कुलला २-१ असे हरविले. साधनाचा भरवशाचा खेळाडू धीरज कुरबेट्टीने दोन गोल करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. विक्रांत मानेचा गोल गडहिंग्लज हायस्कुलचा पराजय टाळू शकला नाही.
चौदा वर्षे गटात रंगतदार सामन्यात एमआऱ हायस्कुलने साधना हायस्कुलवर ३-२ असा रोमहर्षक विजय नोंदविला. एमआरच्या श्रषीकेश भोसलेने उत्कृष्ट दोन गोल करून वर्चस्व राखले. त्याला स्वरुप शेटकेने गोल करून साथ दिली. साधनाच्या अनमोल तरवाळचे दोन गोल अपुरे ठरले. सर्वोदया स्कुलने वि.दि. शिंदे स्कुलवर २-१ अशी मात केली. सर्वोदयाचा साई कडूकर, विराज भोगनने प्रत्येकी एक गोल मारला. शिंदेच्या आदर्श नेवडेने गोल करून चांगली झूंज दिली. सुरज हनिमनाळे, आर्यन दळवी, सुमित कांबळे, श्रवण जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले.








