आयुर्वेदाचार्य मल्हार जोशी यांचे प्रतिपादन
संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयात संशोधन समिती कार्यालयाचे उदघाटन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आयुर्वेद सामान्य नागरिकांनी स्वीकारावा व त्याचा अवलंब करावा असे आपल्याला वाटत असेल तर आयुर्वेदामुळे घडलेल्या सकारात्मक गोष्टी समोर येणे आवश्यक आहे. पुराव्यासह संशोधन सादर झाल्यास आयुर्वेदाची संकल्पना अधिकाधिक लोकांना पटू शकेल यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचे मत सांगली येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य मल्हार जोशी यांनी महागाव (तालुका गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयात स्थापन झालेल्या संशोधन समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.मंगल मोरबाळे या होत्या.
वैद्य जोशी पुढे म्हणाले, कर्करोगाच्या आयुर्वेदिक चिकित्से बाबत शोधन आणि शमन या महत्वपूर्ण चिकित्सा पद्धतीसह अनुषंगिक उपक्रम, रसायन चिकित्सा, पथ्यापथ्य व समुपदेशन याचेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुर्वेदाचा समावेश असलेल्या जीवनशैली अंगीकारल्यास आरोग्यदायी आयुष्य जगता येतो. बदलत्या काळाप्रमाणे आयुर्वेदाच्या क्षेत्रात नवनवीन संशोधन आवश्यक आहे यासाठी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी ही सहभाग होऊन संशोधन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांच्या हस्ते फित कापून समिती कार्यालयाचे उदघाटन झाले. स्वागत व प्रस्तावना डॉ. संगीता मनगुळे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना चित्रफितीद्वारे संशोधन पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे याविषयी माहिती दिली. दरम्यान समितीतील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. प्रीती रावळ, डॉ. मंगेश मोर्ताळे, डॉ.अजित मेतके, डॉ. महेश पाटील, डॉ. शकील सुतार, डॉ. महेश साळुंखे, डॉ. ऋषिकेश माळवदे,डॉ. शर्मिली पाटील, डॉ. समिधा चौगुले डॉ. तेजल पोखरापूरकर, डॉ. शिल्पा शिंदे, डॉ. अस्मिता कांबळे सह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. दिग्विजय पाटील यांनी आभार मानले.



