भडगाव पुलावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू; पुलाखाली पाच फुटावर पाणी
दिवसभरात जोराचा पाऊस झाल्यास पुलावर पाणी येण्याची शक्यता
छायाचित्र : वसंत नाईक, भडगाव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढल्याने हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. भडगाव पुलावरील वाहतूक मात्र अद्याप सुरळीत सुरू असून आज दिवसभरात पावसाचा जोर वाढल्यास पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे.
गडहिंग्लज तालुक्यात गेले दीड महिने पावसाला जोर नसल्याचे चित्र आहे. केवळ पिके जगण्यापुरता पाऊस पडत असल्याने भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईने नागरिक चिंताग्रस्त बनले आहेत. तालुक्यातील बऱ्याच धरणांमध्ये अद्याप समाधानकारक पाणीसाठा झाल्याचे दिसून येत नाही. आजरा तालुक्यात पाऊस होत असल्याने हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत अधून मधून वाढ होताना दिसते. मात्र गेले दोन दिवस झाले गडहिंग्लज तालुक्यात पावसाला जोर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. भडगाव पुलाखाली पाच फूटवर पाणी आहे.
पावसाला जोर असल्याने नदीचे पाणी झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात जोराचा पाऊस झाल्यास सायंकाळी पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे. भडगाव गावच्या पाणी पुरवठा योजनेचे जॅकवेल देखील पुराच्या पाण्यात आहे. सध्या भडगाव पुलावरून वाहतूक सुरू असून गडहिंग्लज- चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास पुलावर पाणी येण्याची दाट शक्यता आहे.




